पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत टीईटीचा निकाल सुमारे तीन ते साडेतीन टक्के टक्के लागत असल्याने या परीक्षेत पात्र ठरणे आव्हानात्मक मानले जाते. मात्र, यंदाच्या निकालात वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा पात्र होणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढणार असल्याचे दिसून येत आहे.

राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी निकालाबाबतची माहिती दिली. परीक्षा परिषदेतर्फे २३ नोव्हेंबर रोजी राज्यभरातील ३७ जिल्हा केंद्रांवर टीईटी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेची अंतरिम उत्तरसूची १९ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या परीक्षेच्या पेपर क्रमांक १ आणि २ च्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तरांसंदर्भातील त्रुटी, आक्षेप २७ डिसेंबरपर्यंत मागवण्यात आले होते. दिलेल्या मुदतीत प्राप्त झालेल्या लेखी निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची १३ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर आता अंतरिम निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. अंतरिम निकाल ऑनलाइन प्रणालीद्वारे उमेदवारांच्या लॉगिनमध्ये ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निकालावर आक्षेप किंवा त्रुटी नोंदवण्यासाठी २१ जानेवारीपर्यंत मुदत आहे. उमेदवारांना त्यांच्या लॉगिनद्वारेच आक्षेप नोंदवता येणार आहेत. अन्य मार्गाने आलेल्या आक्षेपांचा किंवा अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले.

अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने टीईटी अनिवार्यतेचा निकाल दिल्यानंतर यंदाच्या टीईटीमध्ये नोंदणी वाढल्याचे दिसून आले. त्यानुसार या परीक्षेसाठी ४ लाख ७५ हजार ६६९ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ३ हजार ३३४ उमेदवारांनी पेपर १साठी, तर २लाख ७२ हजार ३३५ उमेदवारांनी पेपर २साठी नोंदणी केली आहे. परीक्षा परिषदेने २०१३पासून एकूण आठ वेळा टीईटी परीक्षा घेतली. तसेच परीक्षा दिलेल्या २९ लाख ७४ हजार ६०० उमेदवारांपैकी १ लाख ६ हजार ६६३ उमेदवार पात्र ठरले आहेत. त्यामुळे टीईटीमध्ये पात्र ठरण्याचे सरासरी प्रमाण ३.५ टक्के आहे. आतापर्यंत सर्वाधिक निकाल २०१८मध्ये ५.१३ टक्के, त्यापूर्वी २-१३मध्ये ५.०२ टक्के लागला होता. बाकी सर्व परीक्षांचा निकाल २.३ टक्के ते ३.७० टक्के या दरम्यान आहे. तर २०१८ आणि २०१९ या वर्षीच्या परीक्षांतील गैरप्रकारांमध्ये सहभाग असलेल्या ९ हजार ५३७ उमेदवारांची संपादणूक रद्द करण्यात आली आहे.

टीईटीच्या निकालात यंदा वाढ झाली आहे. जाहीर केलेल्या अंतरिम निकालावर काही आक्षेप आल्यास ते विचारात घेऊन अंतिम निकाल येत्या काही दिवसांत जाहीर करण्यात येईल. – अनुराधा ओक, आयुक्त, राज्य परीक्षा परिषद