पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल जाहीर करण्यात आला. परीक्षेत ५० हजार ३६९ उमेदवार पात्र ठरले असून, यंदाच्या निकालात सात ते आठ टक्क्यांनी मोठी वाढ झाली आहे.

परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे निकालाची माहिती दिली. परीक्षा परिषदेतर्फे २३ नोव्हेंबर रोजी टीईटी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेसाठी ४ लाख ७५ हजार ६६९ उमेदवारांनी नोंदणी केली होती. ४ लाख ४६ हजार ७३० उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी ११.२८ टक्के म्हणजेच ५० हजार ३६९ उमेदवार पात्र ठरले आहेत. परीक्षेची अंतरिम उत्तरसूची १९ डिसेंबर रोजी, तर अंतिम उत्तरसूची १२ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. परीक्षेतील पेपर १ दिलेल्या १ लाख ९० हजार ९०२ उमेदवारांपैकी २१ हजार ८९२ उमेदवार पात्र ठरले. तर पेपर २ दिलेल्या २ लाख ५५ हजार ८२९ उमेदवारांपैकी २८ हजार ४७७ उमेदवार पात्र ठरले आहेत.

आजवर टीईटीमध्ये पात्र ठरण्याचे सरासरी प्रमाण ३.५ टक्के आहे. आतापर्यंत सर्वाधिक निकाल २०१८मध्ये ५.१३ टक्के, त्यापूर्वी २०१३मध्ये ५.०२ टक्के लागला होता. बाकी सर्व परीक्षांचा निकाल २.३ टक्के ते ३.७० टक्के या दरम्यान होता. तर २०१८ आणि २०१९ या वर्षीच्या परीक्षांतील गैरप्रकारांमध्ये सहभाग असलेल्या ९ हजार ५३७ उमेदवारांची संपादणूक रद्द करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या परीक्षेचा निकाल ११.२८ टक्के लागला आहे. त्यामुळे टीईटीच्या निकालात घसघशीत वाढ झाल्याचे दिसून येते.

शिक्षकांना टीईटी पात्र असणे अनिवार्य करण्यात आले आहे, तसेच पदोन्नतीसाठीही टीईटी पात्र असणे बंधनकारक आहे. त्यामुळे टीईटीसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांची संख्या यंदा वाढली. तसेच टीईटीबाबतच्या मार्गदर्शनामध्येही वाढ झाली. परिणामी, टीईटीचा निकाल यंदा वाढला आहे, असे राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी सांगितले.

चार प्रश्न रद्द

परीक्षेची अंतरिम उत्तरसूची १९ डिसेंबर रोजी, तर अंतिम उत्तरसूची १२ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. १६ जानेवारी रोजी अंतरिम निकाल प्रसिद्ध करण्यात आला. अंतरिम निकालावर नोंदवण्यात आलेल्या हरकतीनुसार पेपर एकमधील परिसर अभ्यास विषयातील प्रश्न क्रमांक संच ए १४७, संच बी १४९, संच सी १३७, संच डी १३२ बाबत आक्षेप नोंदवण्यात आले. त्यानंतर तज्ज्ञांच्या अभिप्रायानुसार संबंधित प्रश्न रद्द करण्यात आल्याचे परीक्षा परिषदेने नमूद केले