पुणे : राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना पदवीप्रदान कार्यक्रमापूर्वीच त्यांची शैक्षणिक प्रमाणपत्रे उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या बाबत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या सूचनांनुसार आता उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून पदवीप्रदान कार्यक्रमापूर्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्याबाबतचे धोरण निश्चित करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत.
राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमध्ये पदवीप्रदान कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यात पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका, पीएचडी असे अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची पदवी प्रमाणपत्रे दिली जातात. उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीसाठी विद्यार्थ्यांना गौरवण्यात येते. त्यामुळे पदवीप्रदान कार्यक्रम हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. मात्र, काही वेळा विद्यापीठांच्या पदवीप्रदान कार्यक्रमाच्या आयोजनाला विलंब होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रमाणपत्रे मिळण्यासही विलंब होतो. मात्र, आवश्यक कागदपत्रे वेळेत उपलब्ध न झाल्यास विद्यार्थ्यांचा पुढील शैक्षणिक प्रवेश किंवा नोकरी मिळण्यावर परिणाम होतो.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील विद्यापीठांनी पदवी प्रदान कार्यक्रम आयोजित करण्याची गरज नसून, विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक कागदपत्रे थेट डिजिलॉकरमध्ये उपलब्ध करून देण्याबाबत सूतोवाच केले होते. या अनुषंगाने पाटील यांनी दिलेल्या सूचनांनुुसार, विद्यापीठांच्या पदवी प्रदान कार्यक्रमापूर्वीच विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याबाबतचे धोरण ठरवण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या हालचाली सुरू आहेत. या अनुषंगाने सचिव, संचालक स्तरावरील अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत. येत्या काही दिवसांत त्या बाबतचे धोरण जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निर्देशानुसार पदवीप्रदान कार्यक्रमापूर्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्याबाबत बैठका सुरू आहेत. या बाबत विद्यापीठ कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत त्या बाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. – डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उच्च शिक्षण संचालक
पदवीप्रदान कार्यक्रमापूर्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची कल्पना विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने स्वागतार्ह आहे. मात्र, पदवी प्रदान कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पदवी बहाल केली जाते, ही बाब विचारात घेऊन त्याबाबत धोरण ठरवण्याची गरज आहे. – डॉ. भूषण पटवर्धन, माजी उपाध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग
‘डिजिलॉकर’चा आढावा
डिजिलॉकर सुविधेचा वापर करण्याबाबत या पूर्वी विद्यापीठांना सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे पदवी प्रदान कार्यक्रमापूर्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्याबरोबरच किती विद्यापीठांनी डिजिलॉकर सुविधा वापराबाबत कार्यवाही केली आहे, याचाही आढावा घेण्यात येत आहे.
