पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने वाहन नूतनीकरण प्रक्रियेला ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे १५ लाख व्यावसायिक वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. रिक्षा, टेम्पो तसेच इतर व्यावसायिक वाहनांच्या तंदुरुस्ती तपासणी करण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून रखडले होते.

केंद्र सरकारने रस्ते सुरक्षा अधिक कडक करण्यासाठी व्यावसायिक वाहनांच्या तंदुरुस्ती तपासणीसाठी ‘ऑटोमॅटिक टेस्टिंग स्टेशन’ (एटीएस) प्रणाली अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला. मात्र, राज्यातील अनेक प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) ही यंत्रणा अद्याप सक्षमपणे कार्यरत झालेली नाही. त्यामुळे राज्यातील ११ प्रमुख आरटीओ क्षेत्रांतील सुमारे १५ लाख व्यावसायिक वाहनांच्या नूतनीकरणाचे काम ठप्प झाले होते. परिणामी, रिक्षाचालकांपासून मालवाहतूकदारांपर्यंत उदरनिर्वाहाचे संकट उभे राहिले होते.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून रखडले हे काम मार्गी लागले आहे. केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी या विषयाची माहिती घेत यामध्ये लक्ष घातले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने मोहोळ यांनी हा विषय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मांडला. महाराष्ट्रातील ११ आरटीओ क्षेत्रात केंद्र सरकारच्या रस्ते विकास आणि वाहतूक  मंत्रालयाने एटीएस प्रणाली सक्तीची केल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. वाहनांचे तंदुरुस्ती प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) मिळत नसल्याने रिक्षा, टेम्पो तसेच इतर लहान वाहनाद्वारे  व्यवसाय करणारे छोटे व्यवसाय हवालदिल झाले होते.

या प्रश्नांबाबत केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी याबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर ही अट शिथिल करण्यात आली. त्यानुसार, ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने घेतला. याबाबत बोलताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले,

रिक्षाचालक, लहान वाहतूकदार हा समाजाचा कणा आहे. ‘एटीएस’ प्रणालीतील तांत्रिक त्रुटींमुळे त्यांच्या रोजगारावर गदा येत होती. हा विषय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मांडण्यात आला. त्यांनी त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे छोट्या वाहन वाहतूकदारांना याचा फायदा होणार आहे. रिक्षा फेडरेशनचे नेते बापू भावे म्हणावे, ‘एटीएस’च्या तांत्रिक गोंधळामुळे व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर होता. केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी यामध्ये लक्ष घालून केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्रालयाकडे पाठपुरावा केल्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. आता सर्व वाहन चालकांनी वाहनांचे वेळेत पासिंग करून घ्यावे.