पुणे : पुढील तीन दिवसांत विदर्भ वगळता राज्याच्या अंतर्गत भागात कमाल तापमानात एक ते दोन अंश सेल्सियसने वाढ होऊन त्यानंतर हळूहळू तापमानात घट होण्याची शक्यता आहे. तर पुणे आणि परिसरात आकाश अंशत: ढगाळ राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाच्या पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

गेल्या काही दिवसांत शहर आणि परिसरातील कमाल तापमानात घट झाली होती. मात्र, आता पुन्हा तापमानात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे प्रामुख्याने दुपारी उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार शहरातील कोरेगाव पार्क, पाषाण, शिवाजीनगर, वडगाव शेरी, मगरपट्टा अशा ठिकाणी कमाल तापमान सातत्याने ३५ अंश सेल्सियसपेक्षा अधिक नोंदवले जात आहे. पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप म्हणाले, समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांमुले आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. त्याचा जास्त परिणाम मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रावर होऊन पावसाची शक्यता आहे. बाकी भागात फारसा परिणाम नसल्याने दुपारनंतर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या होत असलेली तापमानवाढ आणखी एक दोन दिवस होऊन, त्यानंतर तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी अकोला येथे राज्यातील सर्वाधिक ४१.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील पुणे येथे ३८, अहिल्यानगर येथे ३८.२, कोल्हापूर येथे ३६.६, जळगाव येथे ३९.५, मालेगाव येथे ३८.६, नाशिक येथे ३७.८, सांगली येथे ३६.५, सोलापूर येथे ३९.४, सातारा येथे ३७.६ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. कोकणातील मुंबई येथे ३२.६, अलिबाग येथे ३३.६, रत्नागिरी येथे ३६.३, डहाणू येथे ३२.९, मराठवाड्यातील धाराशिव येथे ३६.६, छत्रपती संभाजीनगर येथे ३८.५, परभणी येथे ४०.२, विदर्भातील अमरावतदी येथे ४१, बुलढाणा येथे ३८.५, ब्रह्मपुरी येथे ४०, चंद्रपूर येथे ३९.६, गोंदिया येथे ३८.६, नागपूर येथे ३८.८, वर्धा येथे ४० अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. आकडेवारीचा आढावा घेतला असता विदर्भातील काही ठिकाणी तापमान ४० अंश सेल्सियसपेक्षा असल्याचे दिसून येते.

पावसाच्या शक्यतेमुळे विदर्भात ‘यलो अलर्ट’

पुढील चार ते पाच दिवस विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जन, विजांचा कडकडाट, ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे यलो अलर्ट देण्यात आल्याची माहिती हवामानशास्त्रज्ञांनी दिली.