पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वत्र कमाल तापमानात होत असलेली वाढ होत असून, तीव्र उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भात वेगवान वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे.
यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यातच राज्यातील काही ठिकाणी तापमान ३५ अंश सेल्सियसपेक्षा अधिक, तर विदर्भातील अकोला येथे ४० अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे. मार्चमध्येच उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागली आहे. तीव्र ऊन, घामाच्या धारा यांचा अनुभव उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच येत आहे. मात्र, हवामानात होत असलेल्या बदलांमुळे आता पावसाची स्थितीही निर्माण झाली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या पुणे वेधशाळेच्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण झारखंड आणि नजीकच्या उत्तर छत्तीसगडवरील चक्रीय स्थितीपासून एक द्रोणीय रेषा विदर्भामार्गे जात आहे. पुढील तीन दिवस राज्यातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर दोन दिवस, १३ आणि १४ मार्च रोजी मराठवाडा आणि विदर्भात, तर १४ मार्च रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. कोकणात पुढील दोन दिवस कमाल तापमानात फारसा बदल संभवत नाही. त्यानंतर दोन ते तीन अंश सेल्सियसने हळूहळू घट होऊ शकते. मध्य महाराष्ट्रातील अंतर्गत भागात कमाल तापमानात मोठ्या बदलाची शक्यता नाही. तर विदर्भात पुढील तीन दिवस कमाल तापमानात फारसा बदल होणार नसून, त्यानंतर दोन ते चार अंश सेल्सियसने घट होण्याची शक्यता आहे.
विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यांत १३ आणि १४ मार्च रोजी, १४ मार्च रोजी नागपूर, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जना, ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांनायलो अलर्ट देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. पुणे आणि आसपासच्या परिसरात आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
उष्णतेच्या लाटेची शक्यता
विदर्भातील अकोला जिल्ह्यात ११ मार्च रोजी तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून, पालघर, रायगड, ठाणे, मुंबई येथे वातावरण उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
