Maharashtra Weather Update: राज्यात विदर्भात उष्णतेची लाट आलेली असताना पुण्यातही उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. शहरातील लोहगाव येथे सलग तीन दिवस कमाल तापमान ४० अंश सेल्सियसपेक्षा अधिक नोंदवले गेले असून, आणखी तीन ते चार दिवस कमाल तापमान ४० अंश सेल्सियसच्या आसपास राहण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तवली आहे.
कर्नाटक आणि लगतच्या महाराष्ट्रावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटरवर, तसेच वातावरणाच्या मध्य थरात प्रतिचक्रीय स्थिती (अँटी सायक्लोन) आहे. त्यामुळे तापमानामध्ये वाढ होत आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार शहर आणि परिसरात बहुतांश भागात कमाल तापमान ४० अंश सेल्सियसच्या आसपास नोंदवले जात आहे. मंगळवारी सर्वाधिक ४१.८ अंश सेल्सियस तापमान लोहगाव येथे नोंदवले गेले. लोहगाव येथे १३ एप्रिल रोजी ४०.६, १२ एप्रिल रोजी ४०.९ अंश सेल्सियस तापमान होते. त्यामुळे सलग तीन दिवस ४० अंश सेल्सियसपेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले आहे. कोरेगाव पार्क येथे ४०.४, वडगाव शेरी येथे ४०, मगरपट्टा आणि शिवाजीनगर येथे ३९.९, चिंचवड येथे ३९.६, हडपसर आणि एनडीए येथे ३८.५, पाषाण येथे ३८.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ अनुपम कश्यपी म्हणाले, ‘शहरातील लोहगाव हा जास्त शहरीकरण झालेला भाग आहे. तर शिवाजीनगरची वेधशाळा कृषी महाविद्यालयामध्ये आहे. त्यामुळे कमाल तापमान नोंदवण्यातील फरक दिसून येतो. सध्या पुणे शहर आणि परिसरातील स्थिती उष्णतेच्या लाटेसदृश्य आहे. पुढील तीन ते चार दिवस ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.’
काळजी घेणे आवश्यक
सध्याचे हवामान उष्ण आणि दमट स्वरुपाचे आहे. जास्त काळ बाहेर राहिल्यास उष्णतेचा फटका बसू शकतो. त्यामुळे नागरिकांनी या काळात बाहेर पडताना काळजी घेणे आवश्यक आहे, असेही कश्यपी यांनी नमूद केले.
राज्यातील या जिल्ह्यांना यलो अलर्ट…
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार १५ आणि १५ एप्रिल रोजी ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तुरळक हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील तुरळक भागात, तर १६ एप्रिलपासून विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ अशा जिल्ह्यांमध्ये, १७ एप्रिल रोजी जालना, परभणी, हिंगोली, जिल्ह्यातील तुरळक भागात उय्णतेच्या लाटेची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
