पुणे : यंदा पूर्व मोसमी पावसाने फारशी हजेरी न लावल्याने वाढते तापमान, उन्हाच्या चटक्यांनी मे महिन्यात पुणेकर हैराण झाले. यंदा मे महिन्यात शिवाजीनगर येथे केवळ १३.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, २०२३ नंतर यंदाचा मे महिन्यातील पाऊस नीचांकी ठरला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस पुण्यासह राज्यातही वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गेल्यावर्षीचा मे महिना वैशिष्ट्यपूर्ण ठरला होता. मोसमी पाऊस मे महिन्यातच पुण्यात दाखल झाला होता. त्यामुळे पूर्व मोसमी पाऊस, मोसमी पावसामुळे गेल्यावर्षी शिवाजीनगर येथे मे महिन्यातील उच्चांकी पाऊस नोंदवला गेला होता. यंदा तीव्र उष्मा सहन करावा लागल्यामुळे वाढत्या तापमानापासून दिलासा मिळण्यासाठी पूर्व मोसमी पावसाच्या सरी कोसळण्याची अपेक्षा होती. मात्र, यंदा शिवाजीनगर येथे नोंदवला गेलेला मे महिन्यातील पाऊस हा गेल्या तीन वर्षांतील नीचांकी असल्याचे दिसून येते.

हवामान विभागाच्या गेल्या काही वर्षांतील आकडेवारीचा आढावा घेतला असता दशकभरात पाच वेळा शिवाजीनगर येथे मे महिन्यात केवळ एक अंकी पावसाची नोंद झाली आहे. त्यात २०१६मध्ये ६.५, २०१७मध्ये ७.५, २०१८मध्ये ३.७ मिलिमीटर पाऊस पडला होता. २०१९चा मे महिना तर पावसाविना कोरडाच गेला. तसेच २०२२मध्ये ०.७ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला होता.

दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप म्हणाले, मे महिन्यामध्ये पाऊस कमी-जास्त होणे ही सामान्य स्थिती आहे. आता २ ते ५ जून या कालावधीत पुण्यासह राज्यात वादळी पावसाची शक्यता आहे.

दशकभरातील सर्वाधिक किमान तापमान

यंदा शिवाजीनगर येथे पावसाचे प्रमाण कमी नोंदवले गेले असले, तरी उष्मा जाणवण्यास कारणीभूत असलेले किमान तापमान मे महिन्यात वाढल्याचे दिसून आले. यंदा शिवाजीनगर येथे नोंदवले गेलेले २४.१ अंश सेल्सियस हे २०१४पासूनचे सर्वाधिक किमान तापमान ठरले. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार या पूर्वी २०१८मधील २३.९ अंश सेल्सियस हे शिवाजीनगर येथील सर्वाधिक किमान तापमान होते. किमान तापमानात वाढ झाल्यामुळे रात्रीच्या तापमानातही वाढ झाली.

मे महिन्यातील शिवाजीनगर येथे नोंदवल्या गेलेल्या पावसाची वर्षनिहाय आकडेवारी (मिलिमीटरमध्ये)

२०१५ – ११२.७

२०१६ – ६.५

२०१७ – ७.५

२०१८ – ३.७

२०१९ – ०.०

२०२० – ३४.८

२०२१ – ८८.८

२०२२ – ०.७

२०२३ – १९.४

२०२४ – ९५.२

२०२५ – २५०.४