पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कमाल तापमानात घट झाल्यामुळे पुणेकरांना उष्म्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यातच शुक्रवारी दुपारनंतर शहर आणि परिसरात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला आहे.हवामानात झालेल्या बदलांमुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, लातूर, धाराशिव अशा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी, मेघगर्जना विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानुसार पुणे शहर आणि परिसरात दुपारनंतर आभाळ भरून आले. मेघगर्जना, ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला. अचानक वातावरण बदलून पाऊस सुरू झाल्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उद्या कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आली आहे.

विदर्भात उष्णतेची लाट

विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमळ, या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट येण्याची, तसेच काही ठिकाणी रात्रीच्या वेळी उष्ण तापमान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे अकोला, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने दिली.