पुणे : उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तापमानवाढीच्या झळा बसत आहेत. पुणे शहर आणि परिसरात तापमान सरासरीपेक्षा दोन अंश सेल्सियस जास्त असून, कोरेगाव पार्क येथे सर्वाधिक ३७.५ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे. तसेच अकोला येथे तापमान चाळीशीनजीक पोहोचले आहे. मात्र, ५ आणि ६ मार्च रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
गेल्या काही दिवसांत सातत्याने शहर आणि परिसरात तापमान वाढ झाली आहे. सलग दोन दिवस शिवाजीनगर येथे ३५ अंश सेल्सियसपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तापमानाने पस्तिशी ओलांडली आहे. त्याशिवाय शहराच्या उपनगरांमध्येही तापमान वाढत असल्याचे चित्र आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार बुधवारी (४ मार्च) कोरेगाव पार्क येथे सर्वाधिक ३७.५ अंश सेल्सियस तापमान होते. त्याशिवाय शिवाजीनगर येथे ३५.९, चिंचवड येथे ३५.७, लवळे, हडपसर येथे ३५.६, वडगाव शेरी येथे ३५.४, मगरपट्टा येथे ३५.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. पुढील तीन दिवस पुणे आणि परिसरात तापमान निरभ्र राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.
भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप म्हणाले, ऋतु बदलताना तापमानात चढ-उतार होणे स्वाभाविक आहे. सध्या महाराष्ट्रावर प्रतिचक्रवात स्थिती आहे. अशा वेळी वारा वाहत नाही. त्यामुळे तापमानात वाढ होते. येत्या काही दिवसांत तापमानात एक ते दोन अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यातही ठिकठिकाणी तापमान वाढत असल्याचे हवामान विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. बुधवारी अकोला येथे राज्यातील सर्वाधिक ३९.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर मध्य महाराष्ट्रातील जळगाव येथे ३८, कोल्हापूर येथे ३५.३, मालेगाव येथे ३६.८, नाशिक येथे ३६, सांगली येथे ३६.९, सोलापूर येथे ३८.४ अंश सेल्सियस तापमान होते. कोकणातील रत्नागिरी येथे ३६.१, डहाणू येथे ३६.८, मुंबई येथे ३५.७, सांताक्रुझ येथे ३८.७, मराठवाड्यातील धाराशिव येथे ३६.३, छत्रपती संभाजीनगर येथे ३६.८, विदर्भातील अमरावती येथे ३८.८, बुलढाणा येथे ३६.५, ब्रह्मपुरी येथे 38.6, चंद्रपूर येथे ३७.४, नागपूर येथे ३७.२, वाशिम येथे ३८, वर्धा येथे ३८.९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. पुढील चार ते पाच दिवस मराठवाडा आणि विदर्भातील हवामान कोरडे राहण्याची, तापमानात एक ते दोन अंश सेल्सियसने वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
