पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी पाऊस, गारपीट झाली आहे. मात्र, पुढील दोन दिवसांत राज्यात काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

लक्षद्वीप आणि आसपासच्या परिसरात समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवरील थरात चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. मन्नारच्या आखातापासून तामिळनाडू, कर्नाटकपर्यंत द्रोणीय पट्टा आहे. गेल्या चोवीस तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही ठिकाणी मेघगर्जनांसह गारपिटीची नोंद झाली. या गारपीट, पावसाचा शेतीला फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर, पुढील दोन दिवस पाऊस कायम राहण्याची चिन्हे आहेत.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २१ मार्च रोजी लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोल्हापूर आणि घाट परिसर, सांगली येथेही पावसाची शक्यता आहे. तसेच २२ मार्च रोजी सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो.

दरम्यान, गेल्या काही दिवसांत कमाल तापमानात काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते. ४० अंश सेल्सियसवर गेलेल्या तापमानात चार ते पाच अंश सेल्सियसने घट झाली आहे. शुक्रवारी राज्यात सर्वाधिक कमाल तापमान ३७.५ अंश सेल्सियस बुलढाणा येथे नोंदवले गेले. त्याशिवाय मध्य महाराष्ट्रातील पुणे येथे ३५, कोल्हापूर येथे ३४.१, मालेगाव येथे ३३.२, सांगली येथे ३३.६, सोलापूर येथे ३४.८, सातारा येथे ३४.५, कोकणातील मुंबई येथे ३२.१, अलिबाग येथे ३१.६, रत्नागिरी येथे ३२.४, डहाणू येथे ३२.१, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथे ३२.६, परभणी येथे ३४, विदर्भातील अकोला येथे ३५.१, ब्रह्मपुरी येथे ३५.२, चंद्रपूर येथे ३३, गोंदिया येथे ३१.४, नागपूर येथे ३३.८, वाशिम येथे ३६.४, वर्धा येथे ३५.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

कमाल तापमानात वाढ

पुढील दोन ते चार दिवसात राज्यात कमाल तापमानात दोन ते चार अंश सेल्सियसने वाढ अपेक्षित असून, त्यानंतर कमाल तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही. तसेच किमान तापमानातही दोन ते तीन अंश सेल्सियसने वाढ होऊ शकते, असे स्पष्ट करण्यात आले आहे.