पुणे : महाराष्ट्रातील प्रत्येक तीनपैकी एक महिला लठ्ठ किंवा जादा वजनाची असून, प्रत्येक चौथी महिला उच्च रक्तदाबाने आणि प्रत्येक सहावी महिला मधुमेहाने ग्रस्त असल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालातून समोर आली आहे. त्यातही ग्रामीण भागापेक्षा पुणे-मुंबईत ही संख्या अधिक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला. यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील सर्वेक्षण करण्यात आले. पुणे, मुंबई सारख्या महानगरातील महिला आणि पुरुषांप्रमाणेच राज्यातील विविध ग्रामीण भागांत सर्वेक्षण करण्यात आले. या अहवालानुसार, १५ ते ४९ वर्षे वयोगटातील ३१.१ टक्के महिला आणि ३२.८ टक्के पुरुष लठ्ठ किंवा जादा वजनाचे आहेत. याउलट, कमी वजनाच्या महिलांचे प्रमाण १६.२ टक्क्यांवरून १७.१ टक्क्यांपर्यंत आणि पुरुषांचे प्रमाण १२.२ टक्क्यांवरून १७.१ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. यावरून राज्यात एकाच वेळी कुपोषण आणि लठ्ठपणा अशी दुहेरी समस्या असल्याचे दिसून येते.

मधुमेहाच्या बाबतीतही चित्र चिंताजनक आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असलेल्या किंवा मधुमेहावरील औषधे घेणाऱ्या महिलांचे प्रमाण १६ टक्के, तर पुरुषांचे प्रमाण १७.७ टक्के आहे. तुलनात्मक आकडेवारीचा आढावा घेतल्यास स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये मधुमेहाचे प्रमाण महानगर आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात सरासरी पाच ते सात टक्क्यांपर्यंत वाढलेले दिसते. शहरी आणि ग्रामीण भागात उच्च रक्तदाबाचे प्रमाणही वाढले आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. शहरी भागात महिलांचे प्रमाण २६ टक्के, तर पुरुषांचे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत आहे, तर ग्रामीण भागात हे प्रमाण २४.९ टक्के आणि २७.७ टक्के आहे.

दहा पुरुषांमध्ये तीन जणांना तंबाखूचे व्यसन

तंबाखू सेवनाच्या बाबतीत महिलांमध्ये प्रमाण कमी असले, तरी ३१.३ टक्के पुरुष कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या तंबाखूचे सेवन करतात, तर १२.२ टक्के पुरुष मद्यपान करतात. महिलांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण ८.८ टक्के असून, मद्यपान करणाऱ्या महिलांचे प्रमाण केवळ ०.३ टक्के आहे. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, संसर्गजन्य आजारांपेक्षा आता लठ्ठपणा, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या असंसर्गजन्य आजारांचे वाढते प्रमाण ही राज्यासमोरील आरोग्यविषयक मोठी समस्या बनत आहे. त्यामुळे संतुलित आहार, नियमित व्यायाम, तंबाखू-मद्यापासून दूर राहणे आणि वेळेवर आरोग्य तपासणी यावर अधिक भर देण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे.

तज्ञ काय सांगतात ?

ओबेसिटी सर्जरी ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष डॉक्टर शशांक शहा म्हणाले की,मूळातच शरीररचना शास्त्राप्रमाणे स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक लठ्ठ असतात. त्यातच मानसिक ताणतणाव हार्मोन्समधील असंतुलन, गर्भधारणा यामुळे लठ्ठपणा वाढतो. शहरी भागात हे प्रमाण अधिक आहे. पुरुषांमध्येही पोट वाढणे, यकृतावर सूज येणे, उच्च रक्तदाब असे जीवनशैलीजन्य आजार बळावत आहेत.

गेल्या काही काळात जंक फूड आणि फास्ट फूडचे प्रमाण वाढत आहे. यामुळे लठ्ठपणा तर वाढतोच. पण, त्याचप्रमाणे रक्तदाब, मधुमेहाचेही प्रमाण वाढत आहे. स्त्रियांमध्ये पाळी अनियमित होण्याचे प्रमाण अधिक असून, गेल्या काही काळात शहरी भागात या आजारांचे प्रमाण वाढत आहे. असे मत जनरल फिजिशियन डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले.