पुणे : जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांना दर वर्षी शैक्षणिक वर्ष संपताना पुढील वर्षी होणाऱ्या बदलीचे वेध लागतात. मात्र, यंदा जनगणना, मतदारयादीची विशेष पडताळणी मोहीम (एसआयआर) अशी कामे शिक्षकांना करावी लागणार असल्याने जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार नाहीत. ग्रामविकास विभागाने याबाबतच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

ग्रामविकास विभागाच्या उपसचिव वैशाली डिगे यांनी शुक्रवारी या संदर्भातील पत्र सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवले आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या २०२७च्या जनगणनेच्या देशव्यापी वेळापत्रकानुसार राज्यात महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत पूर्ण केला जाणार आहे.

या दरम्यान सुमारे २ लाख ६४ हजार प्रगणक आणि पर्यवेक्षक प्रत्यक्ष घरांना भेट देऊन डिजिटल पद्धतीने माहिती संकलित करणार आहेत. तसेच मतदारयादीची विशेष पडताळणी मोहीमही राबवली जाणार आहेत. या दोन्ही कामांमध्ये शिक्षकांचा सहभाग महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे शिक्षकांना मुख्यालय न सोडण्याचा आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. जनगणना, तसेच मतदारयादीच्या विशेष पडताळणी मोहिमेतील सहभागाच्या सूचना शिक्षकांना देण्यात आल्या आहेत. त्यात जनगणनेचे काम असलेल्या शिक्षकांना मतदारयादीच्या विशेष पडताळणी मोहिमेचे काम देण्यात येणार नसल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. मात्र, काही शिक्षकांना दोन्ही कामांचा आदेश मिळाला आहे.

या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेतील जनगणना, तसेच मतदारयादीच्या विशेष पडताळणी मोहिमेच्या कामाशी संबंधित क आणि ड वर्ग संवर्गातील कर्मचारी, तसेच सर्व जिल्हा परिषद शिक्षकांची यंदा बदली प्रक्रिया न राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्रीय गृहसचिवांच्या अर्धशासकीय पत्राच्या अनुषंगाने ग्रामविकास विभागाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. जनगणनेच्या कामाशी संबंधित क आणि ड वर्ग संवर्गातील कर्मचारी, तसेच सर्व शिक्षक यांची सन २०२६ ची बदली प्रक्रिया राबविण्यात येऊ नये, असे पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया दर वर्षी ऑनलाइन पद्धतीने राबवली जाते. मात्र, जनगणनेमुळे यंदा शिक्षकांच्या बदल्या होणार नसल्याचे दिसून येत आहे.

शिक्षकांना वाट पाहावी लागणार

शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत सुगम आणि दुर्गम असे दोन भाग असतात. सुगम भागात असलेल्या शिक्षकांना दुर्गम भागात, तर दुर्गम भागात असलेल्या शिक्षकांना सुगम भागात पाठवले जाते. मात्र, आता बदल्याच स्थगित करण्याच्या निर्णयामुळे दुर्गम भागातील शिक्षकांना बदलीसाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे काही शिक्षकांनी सांगितले.