राज्य शासनाने आणलेला स्थानिक संस्था कर (लोकल बॉडी टॅक्स- एलबीटी) स्वीकारणे व्यापाऱ्यांना अशक्य असून या कराबाबत निवेदने देऊनही त्यांची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील व्यापारी शिखर संघटनांनी सोमवारी (१ एप्रिल) महाराष्ट्रव्यापी बंद पुकारला आहे.
पूना मर्चंटस र्चेंबरचे रमेशभाई पटेल यांनी गुरुवारी ही माहिती दिली. फॅम, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स- महाराष्ट्र, दि पूना र्मचटस् चेंबर या व्यापारी शिखर संघटनांनी महाराष्ट्रव्यापी बंदचा निर्णय घेतल्याचे पटेल यांनी सांगितले. शासनाकडून व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता सातत्याने कायदे केले जात असून करांची वसुली करून ती शासनाकडे जमा करण्याचीही जबाबदारी व्यापाऱ्यांवर टाकली जात आहे. एलबीटी आणि अन्नसुरक्षा व मानके कायदा ही त्याचीच उदाहरणे असून एलबीटीतील जाचक अटींना व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध आहे, असेही ते म्हणाले.
एलबीटीमुळे व्यापारी वर्गाच्या खर्चात वाढ होणार असून या कराबाबत निवेदने देऊनही शासनाने त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे अखेर सोमवारी महाराष्ट्रव्यापी बंद पुकारण्याचा निर्णय घेतल्याचेही सांगण्यात आले. हा बंद लाक्षणिक असेल.