आजीच्या हातचा साधा वरणभात असो किंवा पिठलं-भाकरी, हे महाराष्ट्रीय भोजन शुद्ध आणि पौष्टिक असेच आहे. आजीच्या हाताची चव पिझ्झा-बर्गरला कशी येणार? थालीपीठ असो किंवा पिठलं-भाकरी; सकस महाराष्ट्रीयन भोजन हे आपल्याला प्रसिद्धीचे तंत्र ठावूक नसल्याने जगभरात जाऊ शकले नाही.. या वास्तवावर प्रकाशझोत टाकला आहे प्रसिद्ध अॅडगुरू प्रल्हाद कक्कर यांनी.
मसाला आणि लोणची उत्पादनाच्या क्षेत्रातील केप्र फूडसच्या नव्या रुपामागची संकल्पना प्रल्हाद कक्कर यांची आहे. केप्रच्या उत्पादनातून तोच स्वाद आणि तीच चव अनुभवण्यासाठी ‘आजी’ हे प्रतीक निवडले असल्याचे कक्कर यांनी सांगितले. केप्र फूडसच्या संचालक अरुणा भट आणि केदार भट या वेळी उपस्थित होते.
मी निम्मा पुणेकर. माझे शिक्षण फग्र्युसन महाविद्यालयातील. ही तीन वर्षे मी वसतिगृहामध्ये राहात होतो. ज्याची आजी उत्तम स्वयंपाक करते तो माझा मित्र, ही माझी मित्र करण्यामागची संकल्पना होती. माझी आजी पटवर्धन असल्याने मीही २५ टक्के पटवर्धनच आहे. तिच्या हातची चव अजूनही माझ्या स्मरणात आहे. आम्ही मित्र सोपानबागेमध्ये सहलीला जायचो. तेव्हा तेथे भरपूर झाडी होती. शेतकरी कुटुंबातील मावशी आमच्यासाठी पिठलं-भाकरी आणून द्यायच्या. त्यामुळे कितीही पंचतारांकित भोजन केले तरी पिठलं-भाकरी हा माझा ‘वीक पॉईंट’ आहे. पुण्यातील या आठवणींना उजाळा देत कक्कर यांनी ‘जो हमने खोया है वो वापस नही आ सकता’ हे शाश्वत सत्य सांगितले. महाराष्ट्रीय भोजन हे प्रसिद्धीअभावी जगाच्या बाजारपेठेपासून दूरच राहिले. ही कसर आता मी केप्रच्या उत्पादनांना जगाच्या बाजारपेठेमध्ये नेऊन भरून काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.