पुणे : ‘भिडेवाड्यात भरवली शाळा, फुलवला शिक्षणाचा मळा’ अशा ओळींतून महात्मा जोतिबा फुले यांच्या कार्याची महती सांगत काव्याचा मळा फुलविणारे अल्पभूधारक शेतकरी आणि फुलेप्रेमी कवी मनोहर पवार (रा. केळवद, जि. बुलडाणा) यांचा शेतातील आंब्याच्या झाडावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या आकस्मिक निधनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या काळात फुलेप्रेमी कवी-कवयित्रींनी मदतीचा हात पुढे केला आणि अवघ्या दहा दिवसांत पवार यांच्या कुटुंबाला तीन लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
मनोहर पवार हे देशातील पहिली मुलींची शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियान व आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलच्या फुलेप्रेमी परिवारातील सक्रिय सदस्य होते. त्यांच्या मागे पत्नी, परिचारिका अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या दोन मुली आणि वृद्ध आई असा परिवार आहे. महात्मा जोतिराव फुले यांच्या समतावादी विचारधारेवर श्रद्धा ठेवून सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत कार्य करणाऱ्या कवी-कवयित्रींना ‘फुलेप्रेमी कवी’ म्हणून ओळखले जाते. मनोहर पवार हे अशाच विचारांचे कार्यकर्ते व कवी.
‘भिडेवाडा’कार फुलेप्रेमी कवी विजय वडवेराव यांनी मनोहर पवार यांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केल्यानंतर देशभरातील फुलेप्रेमी कवी-कवयित्रींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अवघ्या तीन दिवसांत तीन लाख रुपयांचा निधी जमा करण्यात आला.
पवार यांच्या दहाव्याच्या विधीच्या दिवशी केळवद येथे आयोजित कार्यक्रमात विजय वडवेराव यांनी समाजबांधवांच्या उपस्थितीत तीन लाख रुपयांचा धनादेश पवार यांची पत्नी आणि दोन्ही मुलींकडे सुपूर्द केला. या मदतीमुळे कुटुंबाला मोठा आर्थिक आधार मिळाला असून, मुलींच्या शिक्षणासाठीही मदत होणार आहे.
अरविंद बनसोडे, संजय हिवाळे, डॉ. मंजू गौतम राजे-जाधव, मारोती कदम यांच्यासह फुलेप्रेमी कवी, ग्रामस्थ, कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवार या वेळी उपस्थित होता.
‘मदत करणे हे कर्तव्य’
‘भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानाच्या वतीने महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केल्याचे औचित्य साधून दर वर्षी २ ते ५ जानेवारी या कालावधीत आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. या वर्षीच्या कविसंमेलनात मनोहर पवार सहभागी झाले होते. त्यांच्या कुटुंबाला आधार देणे हे कवींचे कर्तव्य आहे, या भावनेतून सर्व फुलेप्रेमी कवी पुढे आले. मी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून चार दिवसांत तीन लाख रुपयांचे संकलन झाले. ही रक्कम त्यांच्या कुटुंबीयांना देऊ शकलो, याचे समाधान आहे, असे विजय वडवेराव यांनी सांगितले.
