पुणे : ‘लोकशाही हक्कांवर निर्बंध आणणारी, वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी करणारी आणीबाणी वाईटच होती. पण, राज्यघटनेचा मुखवटा धारण करून सत्तेवर असलेल्या पक्षाच्या धोरणांमुळे निर्माण झालेली सध्याची अघोषित आणीबाणी ही अर्धशतकापूर्वीच्या आणीबाणीहूनही वाईट आहे,’ असा सूर ‘आणीबाणीला ५१ वर्षे पूर्ण आणि सध्याची अघोषित आणीबाणी’ या विषयावरील चर्चासत्रात सोमवारी व्यक्त करण्यात आला.

महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित चर्चासत्रात माजी आमदार भीमराव पाटोळे, प्रा. विकास देशपांडे आणि ॲड. सुधीर निरफराके यांनी आणीबाणीच्या काळातील आठवणींना उजाळा देतानाच सद्य:स्थितीवर भाष्य केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. मोहन वाडेकर अध्यक्षस्थानी होते. काकी पायगुडे यांनी म्हटलेल्या ‘सत्य सर्वांचे आदी घर’ या महात्मा फुले यांच्या अखंडाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यांच्या हस्ते वक्त्यांचे पुस्तक आणि पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

आणीबाणीच्या काळात समाजवादी नेत्यांनी भोगलेल्या हालअपेष्टांकडे लक्ष वेधून सुधीर निरफराके म्हणाले, ‘कोणताही मंत्री ३० दिवस तुरुंगात राहिला आणि त्याने राजीनामा दिला नाही, तर त्याचे पद बरखास्त होणार ही घटनादुरुस्ती सध्या केंद्रात असलेल्या सरकारने केली. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पदाचा राजीनामा न दिल्याची बोच म्हणून ही घटनादुरुस्ती केली जात आहे. मात्र, हे करण्यासाठी दोनतृतीयांश बहुमाताची आवश्यकता आहे. त्यासाठी वेगवेगळे पक्ष फोडून खासदार संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अघोषित आणीबाणीच्या भीतीची ही सुरुवात आहे. राज्यघटनेचा मुखवटा धारण करून राज्यघटना उल्लंघन करण्याचे काम सुरू आहे.’

विकास देशपांडे म्हणाले, ‘सध्याच्या परिस्थितीत तमिळनाडूमध्ये थलपती विजय आणि केरळमध्ये काँग्रेसचा विजय आशादायक वाटतो. आपण इतके गलितगात्र का झालो?, याचे उत्तर शोधावे लागेल. ‘वो सुबह कभी तो आयेगी’ या आशेवर विश्वास ठेवून समाजवादी विचारांची युवा पिढी तयार करावी लागेल.’

भीमराव पाटोळे म्हणाले, ‘आणीबाणी लागू झाली आणि त्यातूनच भारतीय जनता पक्षाचा जन्म झाला. जनता पक्षाच्या सरकारमध्ये जनसंघ होता. दीनदयाळ फाउंडेशनच्या नावाखाली त्यांनी भरपूर निधी संकलन केले. जनसंघाबरोबर जाऊन समाजवादी चळवळीने नुकसान करून घेतले. देशातील विरोधी पक्षांना संधी आहे. जनक्षोभ असून राममंदिर मुद्द्यावर भाजपाला घेरण्याचे प्रयत्न सुरू ठेवावे लागतील. नितीशकुमार यांच्यासारखा समाजवादी सत्तेबरोबर गेला. व्ही. पी. सिंह पंतप्रधान म्हणून सत्तेत असताना समाजवादी खासदारांची संख्या ८५ होती. आता ती घटली आहे. एकटा अखिलेश यादव लढतो आहे.’

‘पूर्वी पणती चिन्हाच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होत होती हे लहानपणापासून पाहत आलो. पण, त्यांनी चिकाटी सोडली नाही. त्याचा परिणाम म्हणून संघ स्वयंसेवक भाजपच्या माध्यमातून सत्तेवर आहेत,’ असे वाडेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.