scorecardresearch

“महाविकास आघाडीचे आव्हान क्षुल्लक”, चिंचवड पोटनिवडणुकीवर अश्विनी जगताप यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या, “लोक म्हणतात..”

अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्यासमोर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना उर्फ विठ्ठल काटे आणि ठाकरे गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचे आव्हान असणार आहे.

Ashwini Jagtap Chinchwad by elections
चिंचवड निवडणुकीवर अश्विनी जगताप यांची प्रतिक्रिया (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे, असे चित्र सध्या पिंपरी-चिंचवड शहरात आहे. महाविकास आघाडीचे माझ्यासमोर क्षुल्लक आव्हान आहे. गेल्या तीस वर्षांपासून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि माझ्यावर प्रेम करणारी जनता असल्याने माझा विजय नक्की होईक, असा विश्वास भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी व्यक्त केला आहे.

अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्यासमोर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना उर्फ विठ्ठल काटे आणि ठाकरे गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचे आव्हान असणार आहे. अश्विनी लक्ष्मण जगताप या सक्रिय झाल्या असून, मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्याचबरोबर त्या कोपरा सभांवर भर देत आहेत.

हेही वाचा – पुणे पोलिसांची कमाल; चोरीला गेलेले मोबाईल केरळ, कर्नाटक आंध्रमधून शोधून आणले

अश्विनी जगताप म्हणाल्या की, मतदारांची सकाळी घरोघरी भेट घेते आहे. रात्री कोपरा सभा घेऊन जेष्ठ नागरिकांसोबत संवाद साधत आहे. नवी सांगवी, जुनी सांगवी हा आमचा बालेकिल्ला आहे. लोक म्हणत आहेत इथली चिंता करू नका, इतर ठिकाणी प्रचार करा. पुढे त्या म्हणाल्या की, लोकांचा खूप प्रतिसाद आहे. माझ्यासमोर बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना काटे यांचे क्षुल्लक आव्हान आहे. लोकांचे गेल्या तीस वर्षांपासून साहेबांवर असलेले प्रेम बघता मला कसलीही भीती वाटत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – पुण्यात ॲडिनोव्हायरस विषाणूचा शाळकरी मुलांमध्ये संसर्ग

सध्या भाजपाच्या उमेदवार असलेल्या अश्विनी जगताप या प्रचाराबाबत आघाडीवर आहेत. चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक ही तिहेरी होण्याची शक्यता आहे. याबाबतचे चित्र उद्या स्पष्ट होणार आहे. अपक्ष असलेले राहुल कलाटे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी पाठीमागे घेण्यासाठी विनंती केली जात आहे. कलाटे उमेदवारी पाठीमागे घेणार का? यावर देखील चिंचवड मतदारसंघातील राजकीय चित्र अवलंबून आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-02-2023 at 11:34 IST