महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन दोन वर्षे पूर्ण झाली. दरम्यान, विरोधक सरकारवर हल्लाबोल करत आहेत. विरोधकांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ शेरोशायरीतून टोला लगावला आहे. “सौ दर्द छुपे है सीने मे, मगर अलग मजा है जीने मे”, अशा शायरीतून भुजबळ यांनी विरोधकांवर टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने समता पुरस्कार वितरण कार्यक्रमाचं आज पुण्यात आयोजन करण्यात आल होते. छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना यावर्षी समता पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार प्रदान सोहळ्यात छगन भुजबळ यांनी भाषण करताना शेरोशायरीतून विरोधकांवर चौफेर टोलेबाजी केली.

“महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. आजच्याच दिवशी मंत्रिमंडळाने शपथ घेतली होती. मात्र हे सरकार स्थापन झाल्याने अजूनही अनेकांना पचनी पडत नाही. हे सरकार खंबीर आहे. कुणी म्हणते हे सरकार आता पडणार, कुणी म्हणते फ्रेब्रुवारी, कुणी डिसेंबर तर कुणी १५ दिवसात हे सरकार जाणार, असे म्हणत आहेत. मात्र कुणीच कुठे जाणार-येणार नाही. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकार पूर्ण पाच वर्ष टीकणार. त्यानंतर पुन्हा निवडून येईल”, असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. 

भिडे वाड्यात मुलींची शाळा सुरू होणार

“भिडे वाड्यातील शाळेचं काय झालं?, हे विचारणारे खूप भेटतात पण त्यांना फुले वाड्यात कधी यावसं वाटत नाही, असो पण अखेर आम्ही तोही निर्णय घेतला आहे. भिडे वाड्यात मुलींची शाळा सुरू होणार असून पुणे मनपा ही शाळा चालवणार आहे”, असे देखील भुजबळ म्हणाले. 

केंद्राच्या आडमुठ्या भूमिकेमुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल 

ओबीसी जनगणनेबाबत छगन भुजबळ म्हणाले, “केंद्र सरकारला ओबीसींची जनगणना करायला त्यावेळी आम्ही भाग पाडलं. पण केंद्रात भाजपाचे सरकार येताच ओबीसींचा डाटा द्यायला नकार घंटा सुरू झाली. केंद्राच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झालं आणि वरून भाजपाचे लोक ओबीसी जनजागरण मोर्चा काढत आहेत. हा निव्वळ दुटप्पीपणा आहे. आरक्षण मिळवल्याशिवाय राहणार नाही. ओबीसी जनगणना झालीच पाहिजे. गायींची, म्हशींची संख्या मोजतात अरे आम्हाला मोजा आम्ही ५४ टक्के आहोत आणि तुम्ही २७ टक्केच बघता.”

छगन भुजबळ म्हणाले, “अजूनही माझ्या मागे एका मागोमाग एक अडचणी चालूच आहे, त्यांना वाटतं हे घाबरतील इकडून तिकडे जातील. पण असं काही होणार नाही. नहीं बदलते हम औरो की हिसाबसे, एक लिबास हमे भी दिया है खुदा ने अपने हिसाब से”

पद्मश्री, वैगरे कोणालाही मिळतो

“महात्मा फुलेंना भारतरत्न मिळावं अशी मागणी होते. पण महात्मा गांधींना भारतरत्न मिळावं असं कोणी म्हणतं का? माझी थोडी वेगळी भूमिका आहे. महात्मा हे सर्व सन्मानांपेक्षा वरचं पद आहे. पद्मश्री वैगरे कोणालाही मिळतो. त्यामुळे त्याचं कौतुक राहिलेलं नाही”, असे देखील छगन भुजबळ म्हणाले. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahavikas aghadi government complete two years chhagan bhujbal strong attack on the opponents from shayari pune srk
First published on: 28-11-2021 at 15:49 IST