पुणे : राज्यात गेल्या तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघडकीस आल्या आहेत. त्यातील २४ हजार ५०८ वीजचोऱ्यांच्या मूल्यांकनातून ६६ कोटी २८ लाख रुपयांची वीजचोरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत १० हजार ८१० वीजचोरांनी २९ कोटी ८५ लाख रुपयांचा भरणा केला आहे. तर, दंड न भरणाऱ्या २८९ वीजचोरांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच कृत्रिम बुद्धतीमत्तेच्या (एआय) मदतीने या वीजचोऱ्या पकडण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.
महावितरणकडून वीजचोरीविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. तपासणीदरम्यान विजेच्या तारांवर थेट आकडा टाकून किंवा मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. या मोहिमा अधिक प्रभावी पद्धतीने राबविण्यासाठी महावितरणने थेट ‘एआय मॉडेल’ तयार केले आहे. या मॉडेलच्या मदतीने वीजग्राहकांचा किंवा परिसरातील वीज वापराचा जुना आलेख, अचानक वाढलेली किंवा घटलेली मागणी, मीटरमधील तांत्रिक फेरफार आणि इतर ५० हून अधिक तांत्रिक निकषांचे २४ तास सूक्ष्म विश्लेषण करण्यात येते. वीजवापरामध्ये शंकास्पद फरक आढळल्यास, संबंधित ग्राहकांना हाय-रिस्क श्रेणीत टाकले जाते. त्यामुळे कोणत्याही तपासणीशिवाय थेट चोरी होणाऱ्या ठिकाणाची अचूक माहिती या ‘एआय’ माध्यमांवर उपलब्ध होत आहे.
राज्यात वीजचोरांवर कारवाई करण्यासाठी महावितरणची १९० हून अधिक विशेष भरारी पथके कार्यरत आहेत. वीजजोडण्यांच्या तपासणीपासून ते वीज देयकांच्या आकारणीपर्यंत संपूर्ण प्रक्रिया थेफ्ट ट्रॅकिंग अँड मॉनिटरिंग सिस्टीमद्वारे पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे. त्यासाठी स्वतंत्र मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे. वीजचोरीचे ठिकाण ते तपासणीचे छायाचित्र, डिजिटल पंचनामा, जागेवरच वीजपुरवठा खंडित करणे, दंडात्मक देयकांची वसुली आदी माहिती अॅपमध्ये रिअल-टाईम अपडेट केली जाते. त्यामुळे कारवाईत पारदर्शकता आणि वेग आल्याचा दावा महावितरणने केला आहे.
विभागानुसार कारवाई
- छत्रपती संभाजीनगर – ५ हजार ०८३
- कोकण – ११ हजार ०८३
- नागपूर – ५ हजार ९४९
- पुणे – ५ हजार ८४९
- एकूण – २७ हजार ९६४
येत्या तीन वर्षांत महावितरणची तांत्रिक व वाणिज्यिक हानी १० टक्क्यांपेक्षा कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी वीज देयकांच्या थकबाकी वसुलीला प्राधान्य देण्यात येत आहे. वीजचोरीविरुद्ध धडक मोहीम सुरू करण्यात आली असून, वीजचोरीचे प्रकार उघड करण्यासाठी ‘एआय’ मॉडेल विकसित करण्यात आले आहे. त्याद्वारे वीजचोरीविरुद्धची कारवाई आणखी तीव्र आणि अचूक होत आहे. – लोकेश चंद्र, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महावितरण
