नारायणगाव : विघ्नहर कारखान्यास ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वीज बिलांची थकीत वीज देयके ऊस बिलाच्या रकमेतून वसूल न केल्याने महावितरण कंपनीकडून कारखान्यावर ५६ लाख ७२ हजार १५२ रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे कारखान्यास मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत असल्याचे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी सांगितले.
हेही वाचा >>> पुणे: टेकड्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांचा मतदानाचा हक्क काढून घ्या; विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा सल्ला




शेरकर म्हणाले, की विघ्नहरच्या ६ मेगावॅट क्षमता असलेल्या सहवीज निर्मिती प्रकल्पाचे वीज करारानुसार ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या ऊस बिलांमधून संबंधित शेतकरी वर्गाच्या थकीत वीज देयकांची रक्कम कारखान्याने वसूल करून द्यावी असे नमूद होते. मात्र, ऊस पुरवठा करणाऱ्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचे ऊस बिलातून थकीत वीज देयके कपात करण्यास प्रखर विरोध दर्शविला. कारखान्याने संबंधितांची थकीत वीज देयके ऊस बिलांमधून वसूल केली नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी वर्गास दिलासा मिळाला. मात्र, वीज वितरण कंपनीने विघ्नहर कारखान्यास ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून थकीत वीज देयके वसूल न केल्यामुळे कारखान्यास २०२०-२१ या वर्षासाठी २६ लाख २१ हजार ६० रुपये, तर २०२१-२२ या वर्षासाठी ३० लाख ५१ हजार ९२ रुपये असा ५६ लाख ७२ हजार १५२ रुपये दंड आकारला आहे.