वीज सेवेबाबत महावितरणची लपवाछपवी अद्यापही सुरूच ;  पाच महिन्यांपासून विश्वासार्हता निर्देशांकाची प्रसिद्धी नाही

पुणे : राज्यातील वीज ग्राहकांना किती तांत्रिक बिघाडांना सामोरे जावे लागले आणि त्यामुळे त्यांना किती काळ अंधारात घालवावा लागला, आदी वीजसेवेबाबतची माहिती नागरिकांसाठी जाहीर करण्यातील लपवाछपवी महावितरणकडून अद्यापही सुरूच आहे. महावितरणकडून गेल्या पाच महिन्यांपासून सेवेबाबतचे विश्वासार्हता निर्देशांक प्रसिद्ध केलेले नाहीत. ‘सजग नागरिक मंच’चे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी पुन्हा एकदा ही बाब वीज नियामक आयोगाच्या निदर्शनास […]

वीज सेवेबाबत महावितरणची लपवाछपवी अद्यापही सुरूच ;  पाच महिन्यांपासून विश्वासार्हता निर्देशांकाची प्रसिद्धी नाही
प्रतिनिधिक छायाचित्र

पुणे : राज्यातील वीज ग्राहकांना किती तांत्रिक बिघाडांना सामोरे जावे लागले आणि त्यामुळे त्यांना किती काळ अंधारात घालवावा लागला, आदी वीजसेवेबाबतची माहिती नागरिकांसाठी जाहीर करण्यातील लपवाछपवी महावितरणकडून अद्यापही सुरूच आहे. महावितरणकडून गेल्या पाच महिन्यांपासून सेवेबाबतचे विश्वासार्हता निर्देशांक प्रसिद्ध केलेले नाहीत.

‘सजग नागरिक मंच’चे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी पुन्हा एकदा ही बाब वीज नियामक आयोगाच्या निदर्शनास आणून दिली आहे. आयोगाने घालून दिलेल्या नियमांनुसार महावितरणला प्रत्येक महिन्याला सेवेबाबतचे विश्वासार्हता निर्देशांक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे बंधन घातले आहे. मात्र, अनेकदा ते जाहीर करण्याचे टाळले जात असल्याची बाब वेळेवेळी समोर आली आहे. सध्या महावितरणने त्यांच्या संकेतस्थळावर मार्च २०२२ नंतरचे निर्देशांक प्रसिद्धच केलेले नाहीत. यापूर्वीही वेलणकर यांनी आयोगाकडे तक्रार दिली होती. सप्टेंबर ते जून २०२१ हे तीन महिने, तर जानेवारी ते मार्च २०२२ या तीन महिन्यांतील निर्देशांक प्रसिद्ध न केल्याबाबत तक्रार करण्यात आली होती. विशेष म्हणजे तक्रार झाल्यानंतर तातडीने त्याचे प्रसिद्धी करण्यात आली होती.

महावितरणने प्रसिद्ध केलेल्या शेवटच्या म्हणजे मार्च २०२२ मधील माहितीनुसार या माहिन्यात राज्यात वीज खंडित होण्याच्या १४ हजार २०५ घटना घडल्या. त्यात अडीच कोटी ग्राहकांना एकूण ४१ हजार ४९५ तास अंधारात बसावे लागले. पुण्यासारख्या शहरातही वीज खंडित होण्याच्या ९२३ घटना घडल्या असून, तीन लाख नागरिकांना २९६१ तास अंधारात बसावे लागल्याचे वेलणकर यांनी आयोगाला दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. महावितरणला नियमाप्रमाणे सातत्याने विश्वासार्हता निर्देशांकांची प्रसिद्धी करण्यास भाग पाडावे. महत्त्वाचे म्हणजे त्यातून समोर येणाऱ्या ढिसाळ कारभारात सुधारणा करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास त्यांना बाध्य करावे, अशी मागणी वेलणकर यांनी आयोगाकडे केली आहे.

महावितरणकडून सातत्याने विश्वासार्हता निर्देशांकांची प्रसिद्धी करणे टाळले जाते. प्रत्येक महिन्याला महावितरणने स्वत:हून माहिती जाहीर करणे अपेक्षित असताना त्याबाबत तक्रार करावी लागणे दुर्दैवी आहे. तक्रार केल्यानंतर मात्र माहिती जाहीर केली जाते. म्हणजेच माहिती तयार असतानाही ती प्रसिद्ध केली जात नाही. कारण या माहितीतून महावितरणच्या कारभाराचे चित्र स्पष्ट होत असते.– विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mahavitran continues to hide information about electricity service to the citizens pune print news zws

Next Story
राष्ट्रवादी काँग्रेसकडून महागाईची दहीहंडी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी