पुणे : स्मार्ट मीटर बसवण्याबाबत ग्राहकांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी ‘महावितरण’कडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.

स्मार्ट मीटर मोहिमेअंतर्गत महावितरणचे अधिकारी व कर्मचारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जाऊन मेळावे घेत आहेत. त्यासाठी विशेष पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. ही पथके मोठमोठ्या गृहनिर्माण संस्थांमध्ये जाऊन तेथील सभासदांना एकत्र करुन स्मार्ट मीटरचे फायदे समजावून सांगत आहेत. त्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांचे गैरसमज दूर करत आहेत, अशी माहिती महावितरणकडून निवेदनाद्वारे देण्यात आली.

‘पुण्यातील मोहिमेला प्रतिसाद’

महावितरणतर्फे राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटर मोहिमेला पुणे शहरात आणि परिसरात ग्राहकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या विशेष मोहिमेमुळे पुणे विभागात १४ लाख १३ हजार १९३ स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत.

स्मार्ट मीटरच्या जनजागृतीसाठी मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी विभागांनुसार पूर्णवेळ पथके तयार केली आहेत. प्रत्येक पथकांमध्ये दोन अभियंत्यांसह पाच जणांचा समावेश असून, ही पथके मोठमोठ्या गृहनिर्माण संस्थांमध्ये जाऊन तेथील सभासदांना एकत्र करुन स्मार्ट मीटरचे फायदे समजावून सांगत आहेत. त्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांचा गैरसमज दूर करत आहेत. एका आठवड्यात या पथकांनी सुमारे दोनशे मेळावे घेऊन ४० हजारांहून अधिक वीज ग्राहकांच्या शंकाचे निरसन करण्यात आले आहे. त्याशिवाय दोन चित्ररथ (LED Van) गर्दीच्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसविण्याबाबत जनजागृती करत असल्याची माहिती ‘महावितरण’कडून देण्यात आली.

पुणे विभागात सुमारे ३९ लाख वीज मीटर आहेत. त्यापैकी गणेशखिंड शहर विभागात ५ लाख २८ हजार ३२६, रास्तापेठ शहर विभागात ५ लाख २४ हजार २२२ आणि पुणे ग्रामीण विभागात ३ लाख ६० हजार ६४५ स्मार्ट मीटर बसविण्यात आल्याचेही ‘महावितरण’कडून स्पष्ट करण्यात आले.

‘स्मार्ट मीटरचे फायदे’

  • सौर तासांत विशेष सवलत : सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत वीज वापरल्यास ग्राहकांना प्रति युनिट ८५ पैसे इतकी (TOD – Time of Day) सवलत वीजबिलात मिळते.
  • अचूक वीजबिल : मानवी हस्तक्षेपाशिवाय डिजिटल रिडिंग होत असल्याने चुकीच्या किंवा अंदाजे बिलाची शक्यता पूर्णपणे संपुष्टात येते.
  • वीज वापराचे नियंत्रण : ग्राहक मोबाईल ॲपद्वारे आपल्या दैनंदिन आणि तासाभराच्या वीज वापराचा आलेख कधीही पाहू शकतात. यामुळे ग्राहकाला वीजबचतीचे नियोजन करता येते.
  • बिघाड समजतो : तांत्रिक बिघाड किंवा वीज पुरवठ्यातील समस्येची माहिती महावितरणला तात्काळ समजते, ज्यामुळे बिघाड लवकर दुरुस्त करणे शक्य होते.

‘वीज ग्राहकांना आवाहन’

‘स्मार्ट मीटर हे ग्राहकांच्या सोयीसाठी आणि वीज वितरण यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. सोशल मिडियाद्वारे पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता सोसायटीत कर्मचाऱ्यांची पथके आल्यास त्यांच्याकडून शंकांचे निरसन करून घ्यावे. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून सहकार्य करावे,’ असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.