पुणे : प्रत्येक महिन्यात शंभर युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांना मोफत वीज मिळण्यासाठी राज्य सरकारने स्मार्ट योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत महावितरणकडून मागवण्यात आलेल्या कंत्राटांमध्ये एक किलोवॅट क्षमतेच्या छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाची किंमत १५ हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे.
सध्या सौरऊर्जा पुरवठादारांकडून एका किलोवॉटच्या सौर प्रकल्पासाठी साठ हजार रुपये आकारले जातात. मात्र, महावितरणच्या नव्या निर्णयानुसार नवा दर ४५ हजार रुपये करण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेतील लाभार्थी सुमारे ५ लाख घरगुती ग्राहकांची मोठी बचत होणार आहे. तसेच साठ हजारच्या ऐवजी ४५ हजार रुपयात एक किलोवॅटचा छतावरील सौरऊर्जा बसविता येत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे आगामी काळात असे प्रकल्प बसविणाऱ्या सर्व गरजू ग्राहकांनाही योजनेचा लाभ घेणे सहज शक्य होईल, असा दावाही महावितरणकडून करण्यात आला.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गरीब ग्राहकांसाठी स्मार्ट योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी महावितरणला अंमलबजावणी यंत्रणा म्हणून जबाबदारी देण्यात आली. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत स्मार्ट योजनेच्या नव्या कंत्राटाला मान्यता देण्यात आली. या बैठकीला राज्याच्या अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला उपस्थित होत्या.
केंद्र सरकारकडून फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू करण्यात आली. या माध्यमातून घरगुती वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी एका किलोवॅटला तीस हजार रुपये, दोन किलोवॅटला साठ हजार रुपये आणि तीन किलोवॅटला ७८ हजार रुपये थेट अनुदान मिळते. ऊर्वरित खर्च ग्राहकाने करायचा असतो. एका किलोवॅटच्या प्रकल्पातून दरमहा सुमारे १२० युनिट वीज तयार होते. ग्राहकाच्या गरजेपेक्षा जास्त वीज तयार झाल्यामुळे वीजबिल शून्य येते आणि अतिरिक्त वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळवता येते.
केंद्र सरकारच्या अनुदात वाढ करत राज्य सरकारच्या वतीने दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ५ लाख ग्राहकांसाठी स्मार्ट योजना राबवण्यात येत आहे. आता एका किलोवॉटच्या सौर प्रकल्पाची किंमत पंधरा हजार रुपयांनी कमी करण्यात आल्याने वीज ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. सौरऊर्जा प्रकल्प बसविणाऱ्या सूचिबद्ध पुरवठादारांची यादी महावितरणने आपल्या वेबसाईटवर आणि स्मार्ट योजनेच्या पोर्टलवर उपलब्ध केल्याचा दावा महावितरणने निवेदनाद्वारे केला.
