पुणे : उन्हाळ्याच्या कालावधीत घरातील एसी, पंखा आणि वीजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर वाढतो. त्यामुळे महिन्याचे वीजबिलही नेहमीपेक्षा वाढलेले असते. अशा काळात विजबिल कमी करण्यासाठी काय करायचे, हा मोठा प्रश्न सामान्य वीजग्राहकांसमोर असतो. आता महावितरणकडून सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेतील वीजवापरासाठी टीओडी (टाइम ऑफ डे) ग्राहकांना सवलत देण्यात येत असल्यामुळे वीजग्राहकांना बसणारी झळ काही प्रमाणात कमी होत असल्याचे समोर आले आहे.

राज्य वीज आयोगाच्या आदेशानुसार महावितरणकडून टिओडी ग्राहकांसाठी जुलै २०२५ पासून सवलत देण्यात येत आहे. विजेचा वापर कोणत्या वेळेत झाला, त्याच्या आधारे वीजदरात सवलत दिली जाते. त्याला टीओडी सवलत म्हणतात. या माध्यमातून राज्यातील ७० लाख ग्राहकांनी आतापर्यंत २ हजार २३५ कोटी रुपयांची बचत केल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.

वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार सर्व घरगुती ग्राहकांना टीओडी सवलत देण्यात येत असून, या आर्थिक वर्षात सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीतील वीजवापरासाठी प्रती युनिट ८५ पैसे सवलत देण्यात येत असल्याचेही महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार ६९ लाख ३५ हजार ३८८ घरगुती ग्राहकांना १ हजार ०९६ दशलक्ष युनिट विजेसाठी ८९ कोटी रुपयांची सवलत देण्यात आली आहे.

राज्यात जुलै २०२५ पासून १० किलोवॅटपेक्षा जास्त भार असलेल्या औद्योगिक आणि वाणिज्यिक वीज ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वीज वापरासाठी एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान १५ टक्के, तर ऑक्टोबर ते मार्च दरम्यान २५ टक्के सवलत देण्यात येत आहे. त्यानुसार १५ हजार ९०७ उच्चदाब औद्योगिक ग्राहकांना १ हजार ५३४ कोटी रुपयांची सवलत देण्यात आली. तर, ४३ हजार ९११ औद्योगिक ग्राहकांना १ हजार ७७४ कोटी रुपये आणि ११ हजार ०१७ वाणिज्यिक ग्राहकांना २३९ कोटी रुपयांची सवलत मिळाली आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा आणि अन्य सार्वजनिक सेवांनाही टिओडी सवलत देण्यात येते. या सेवा पुरवणाऱ्या सरकारी आस्थापनांना १२ हजार ९८९ ग्राहकांना २०२ कोटी रुपयांची सवलत मिळाल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.

सवलतीसाठी स्मार्ट मीटर आवश्यक

स्मार्ट मीटरमध्ये कोणत्या वेळी किती वीजवापर झाला, हे मोजण्याची सुविधा असल्याने स्मार्ट मीटर बसविलेल्या ग्राहकांनाच टिओडी सवलत मिळते. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीतील वीजवापरावर ग्राहकांना सवलत देण्यात येत आहे. राज्यात सौरऊर्जेची उपलब्धता वाढली असून, ही वीज स्वस्त मिळत असल्याने महावितरणकडून राज्य वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार दिवसाच्या वीजवापरासाठी सवलत लागू केली.

वीज ग्राहकांनी अधिक विजेची गरज असणारी उपकरणे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत प्राधान्याने वापरून अधिकाधिक प्रमाणात टीओडी सवलत मिळवाली, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. घरोघरी स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेने वेग घेतला असून, टीओडी लाभ मिळणाऱ्या घरगुती वीजग्राहकांची संख्याही वाढत असल्याचेही महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.

ग्राहकांची वर्गवारी….. मिळालेली सवलत

६९ लाख ३५ हजार ३८८ घरगुती ग्राहक… ८९ कोटी रुपये
१५ हजार ९०७ उच्चदाब औद्योगिक ग्राहक….. १ हजार ५३४ कोटी
४३ हजार ९११ औद्योगिक ग्राहक…. १ हजार ७७४ कोटी रुपये
११ हजार ०१७ वाणिज्यिक ग्राहक…. २३९ कोटी रुपये
१२ हजार ९८९ सार्वजनिक सेवा पुरवणारे ग्राहक… २०२ कोटी रुपये