मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गट अशी थेट लढत आहे. आजपर्यंतचा इतिहास पाहता मावळ लोकसभेत शिवसेनेचा खासदार दिल्लीत गेलेला आहे. यावेळी दोन्ही शिवसेनेमध्ये सामना आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज नुकताच भरला. पण, चर्चा आहे ती उमेदवारी अर्ज भरताना झालेल्या गर्दीची. बारणे यांचा उमेदवार अर्ज भरताना अल्प गर्दी होती, तर संजोग वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज भरताना बारणेपेक्षा अधिक गर्दी असल्याची चर्चा मावळ लोकसभा मतदारसंघात आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे यांची आत्तापर्यंत चलती आहे. दोन वेळा मोदी लाटेत निवडून आलेल्या श्रीरंग बाराणेंना ही लोकसभा काहीशी जड जाण्याची शक्यता असल्याचं बोललं जातं आहे. २२ एप्रिल रोजी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थित उमेदवारी अर्ज भरला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असल्याने रॅलीला मोठी गर्दी असेल, असे प्रत्येकाला वाटत होतं. प्रत्यक्षात गर्दी कमी आणि ढोल ताशा पथकाची रांग होती. यावरूनच आता बारणेंच्या रॅलीबद्दल शहरात जोरदार चर्चा झाली.

हेही वाचा – पिंपरी : वाकडमध्ये नाकाबंदी दरम्यान २७ लाखांची रोकड जप्त

दुसऱ्या दिवशी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. श्रीरंग बारणे आणि आमची रॅली बघून लोकसभेचे चित्र स्पष्ट होईल असा विश्वास वाघेरे यांनी आधीच व्यक्त केला होता. तशी ताकदही बघायला मिळाली. माजी मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अमोल कोल्हे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिक ठाकरे, सचिन अहिर यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली. बारणेपेक्षा अधिक गर्दी महाविकास आघाडीच्या रॅलीत होती. श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे यांच्या रॅलीची तुलना होऊ लागली आहे. याची शहरात आणि मावळ लोकसभा मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे.

श्रीरंग बारणे यांनी केला होता पार्थ पवारांचा पराभव

२०१९ ला झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा श्रीरंग बारणे यांनी दोन लाख १५ हजार ९१३ मताधिक्याने पराभव केला होता. अजित पवार यांच्यासह सुनेत्रा पवार यांनीही कोपरा सभा घेऊन पार्थ पवार यांचा प्रचार केला होता. अख्ख पवार कुटुंब पार्थसाठी मैदानात उतरलं होतं. तरीही पवार कुटुंबातील सदस्याचा पराभव झाला. यामुळे श्रीरंग बारणे यांचा उत्साह द्विगुणित झाला होता. आजही श्रीरंग बारणे हे पार्थच्या पराभवाचा उल्लेख करताना दिसतात. २०१९ ची राजकीय परिस्थिती आणि आताची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. बारणे यांच्या पुढे संजोग वाघेरे यांचं आव्हान असेल. बारणे आधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसनेतून निवडून आलेले आहेत.

हेही वाचा – प्रतिष्ठित कान चित्रपट महोत्सवात पुण्याच्या एफटीआयआयचा लघुपट

“ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी आहे. रॅलीमुळे कोण जिंकेल हे चित्र स्पष्ट होईल. महाविकास आघाडीचा विजय नक्की होईल”. – संजोग वाघेरे, महाविकास आघाडी उमेदवार

“मावळ लोकसभा मतदारसंघात केलेल्या विकासावर निवडणूक लढवत आहे. मागचे रेकॉर्ड तोडून मोठ्या मताधिक्याने जिंकणार आहे. मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यकर्ते होते”. – श्रीरंग बारणे, महायुती उमेदवार