पुणे: ‘देशाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीत सहकार क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, तंत्रज्ञान आणि कौशल्याच्या जोरावर या क्षेत्रातून एक ट्रिलियन डॉलर्सचे योगदान देण्याचे उद्दिष्ट गाठणे शक्य आहे,’ असा दावा पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य प्रा. एस. महेंद्र देव यांनी येथे शुक्रवारी केला. गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या वतीने ‘सहकार डिजिटल शिखर परिषदे’चे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन प्रा. देव यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाचे संचालक सतीश मराठे, संस्थेचे कुलगुरू डॉ. उमाकांत दाश, परिषदेचे संयोजक प्रवाश प्रधान या वेळी उपस्थित होते. ‘सहकारातून समृद्धी’ या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी सहकारी संस्थांनी पारंपारिक पद्धती सोडून ‘डिजिटल’ होणे काळाची गरज आहे,’ असे स्पष्ट करतानाच प्रा. देव यांनी सहकारी संस्थांना ‘फ्युचर रेडी’ करण्यासाठी सहकार क्षेत्राच्या डिजिटल विकासाचा आराखडा मांडला.
ते म्हणाले, ‘सहकारी संस्थांची माहिती एकत्र करण्यासाठी राष्ट्रीय सहकारी डेटाबेस तयार करण्यात आल्याने संस्थांच्या कार्याचे अचूक मूल्यमापन शक्य झाले आहे. मात्र, काही सहकारी संस्था अद्याप कागदोपत्री कामकाज करतात. त्यांनी रिअल-टाइम डेटा विश्लेषणासाठी आधुनिक प्रणालीचा अवलंब करावा लागेल.

‘को-ऑपरेटिव्ह डिजिटल स्टॅक’च्या माध्यमातून सहकारी संस्थांना माहिती आणि डेटा विश्लेषणासाठी सामायिक डिजिटल पायाभूत सुविधा उपलब्ध करून देता येतील, पारदर्शकतेसाठी कृत्रिम प्रज्ञेचा वापर करता येईल.’

‘जगातील सर्वांत मोठी सहकारी चळवळ असून ८५ टक्के ग्रामीण भाग या क्षेत्राशी जोडलेले आहेत. देशात १९९१ नंतरच्या सुधारणांचा फायदा खासगी क्षेत्राला अधिक झाला. सहकार क्षेत्रात सहकारी संस्थांना भांडवल उभारणीची परवानगी आणि स्वायत्तता देण्यासाठी नवीन धोरणांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे,’ असे सतीश मराठे यांनी स्पष्ट केले.

प्रा. उमाकांत दाश यांनी परिषदेच्या आयोजनामागील भूमिका मांडली. प्रवाश प्रधान यांनी शिखर परिषदेचा उद्देश आणि दोन दिवसांच्या कार्यक्रमांची माहिती दिली. रबी नारायण मिश्रा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

जागतिक अस्थिरतेच्या काळातही भारतीय अर्थव्यवस्था सात ते साडेसात टक्के दराने वाढत आहे. सन २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दरडोई उत्पन्न वाढवणे, सर्वसमावेशक विकास आणि दर्जेदार शिक्षण-आरोग्य व्यवस्था निर्मितीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. त्यामध्ये सहकार क्षेत्र महत्त्वाची भूमिका आहे.

-प्रा. एस. महेंद्र देव, पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषद सदस्य