श्रीराम ओक

स्वत:साठी जगण्याबरोबरच इतरांचे जीवन समृद्ध व्हावे अशी इच्छा असणारे महेंद्र शेंडे. प्रवासाची, गाण्याची आवड आणि त्याबरोबरच सामाजिक कार्यासाठी आवर्जून दिलेला वेळ आणि त्यासाठी केलेले नियोजन. यामुळे लहान मुलांचे व्यक्तिमत्त्व फुलावे, तसेच त्यांच्याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांच्याही जीवनात आनंद फुलावा यासाठी सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपला जीवनप्रवास दिशादर्शक केला आहे.

‘प्रवास’ हा शब्द तुमच्याआमच्या जगण्यातला एक अविभाज्य घटक आहे. प्रवासाची आवड असणारी मंडळी पदयात्रेपासून विविध वाहनांचा उपयोग करीत प्रवास करतात. काही जण विशिष्ट हेतू मनात ठेवून प्रवास करतात तर काही मंडळी उगाचच फिरतात. आयुष्याच्या प्रवासाचे देखील असेच असते. काही जण ठरवून आपला जीवनप्रवास करतात. जीवनात स्वत: आनंदी राहण्याबरोबरच इतरांच्याही जीवनात आनंदाची फुलबाग फुलवणाऱ्यांमध्ये महेंद्र शंकर शेंडे यांचे नाव आवर्जून घ्यायला हवे. पोटापाण्यासाठी नोकरी झाल्यानंतर सेवानिवृत्तीच्या काळात स्वत:चा प्रवासाचा छंद जोपासण्याबरोबरच समाजाची गरज पूर्ण करण्यासाठी आपला वेळ आणि प्रसंगी पैसा देखील खर्च करण्याचे व्रत शेंडे यांनी मागील १७ वर्षांपासून सांभाळले आहे. ते बँक ऑफ इंडिया येथून उपप्रबंधक पदावरून २००० साली सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर पैसे मिळविण्यासाठी काहीही करायचे नाही हे त्यांचे आधीच ठरलेले. त्यानुसार त्यांनी आपला फिरण्याचा छंद जोपासण्याबरोबरच आपल्या सामाजिक कार्याच्या मार्गावरील जीवनप्रवासाला देखील सुरुवात केली.

मुळातच त्यांचा पिंड हा समाजसेवेने भारलेला. त्यामुळे स्वत:ला काय मिळाले यापेक्षाही दुसऱ्यासाठी काही करण्याची त्यांची तीव्र इच्छा. या इच्छेतूनच त्यांनी पंधरा वर्षांमध्ये साडेतीनशेहून अधिक यात्रा केल्या तसेच विविध प्रकारच्या सामाजिक कार्यानीयुक्त अशी आपली दिनचर्या देखील आखली. विविध सामाजिक संस्थांवर पदाधिकारी म्हणून कार्य करण्याबरोबरच लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आपल्या जीवनप्रवासातील बहुतांश वेळ खर्ची घातला. मोठय़ा कुटुंबात राहिलेल्या, पण वृद्धाश्रमाचे जीणे नशिबी आलेल्या आजींना त्यांचे हक्काचे घर मिळवून देण्याबरोबरच विविध संस्थांमधील मुलांना त्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित व्हावे म्हणून मदत करणे, शिकवण्यापर्यंत त्यांनी विविध प्रकाराने सामाजिक क्षेत्रात कार्य केले.

वनवासी कल्याण आश्रमाद्वारे ‘गुही’ या नाशिक जिल्ह्य़ातील छोटय़ाशा गावात साडेचारशे आदिवासी मुलामुलींसाठी शाळा सुरू करण्याच्या प्रकल्पात त्यांनी जसा सहभाग घेतला, तसेच मेळघाट मैत्रीच्या माध्यमातून ‘शंभर दिवसांची शाळा’ या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजीबरोबरच पंधरा दिवसांच्या शिकविण्याच्या उपक्रमातही अनेकदा सहभागी झाले. वेल्हे येथील तोरणा राजगड विकास परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी ते दर शनिवार-रविवारी तेथे जाऊन मुलांना इंग्रजी शिकवायचे. स्नेहसेवा या संस्थेद्वारे कोथरूड परिसरात चालविल्या जाणाऱ्या दवाखान्यांच्या काही कामांची जबाबदारी देखील महेंद्र यांच्याकडे आहे. शिवाय ‘माया केअर’ या संस्थेच्या माध्यमातून चार ज्येष्ठ नागरिकांच्या घरी आठवडय़ातून ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी जाऊन गप्पा मारणे, पुस्तके वाचून दाखवणे, गाणी म्हणणे, ज्यांना कोणाच्या सोबतीशिवाय चालता येत नाही, त्यांना फिरायला घेऊन जाणे आदी उपक्रमांमध्ये ते सहभागी होतात. यापैकी एका कुटुंबातील नव्वदीतील आजोबांना फिरायला नेण्यापासून शहाऐंशी वर्षांच्या आजींना पेटी वाजवून भजने म्हणून दाखविणे, यामध्येही त्यांचा सहभाग असतो, ते त्यांच्या गाण्याच्या आवडीतूनच.

त्यांना सर्व प्रकारच्या गाण्यांची आवड, त्यातही भक्तिसंगीत त्यांना अधिक प्रिय. प्रत्येक प्रवासात खिशात नेहमी टाळ ठेवलेले. याचाच एक भाग म्हणून त्यांनी ‘गाणी विठ्ठलाची’ या कार्यक्रमाची तयारी केली आणि अल्पावधीतच सुमारे पन्नास कार्यक्रम केले, तेही कोणतेही मानधनाची अट न घालता. या आवडीतूनच नांदेड फाटा येथील साईबाबा अंध महिला वृद्धाश्रमात प्रत्येक गुरुवारी, दुपारी एक तास तेथे जाऊन आजी मंडळींबरोबर गानसेवाही ते करतात. शिवतीर्थनगर येथील गणपतीच्या देवळात रोज सकाळी एक तास भजने म्हणायला जाण्याचा त्यांचा नित्यक्रम ठरलेला. वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी देखील त्यांचा विविध ठिकाणचा प्रवास हा स्कूटरवरूनच सुरू असतो. त्यांच्या गाण्याच्या कार्यक्रमात शास्त्रीय संगीतात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या त्यांच्या पत्नीचा, मानसीचा जसा सहभाग तसाच महेंद्र यांच्या सामाजिक कार्यासाठी भरघोस पाठिंबा. मानसी या देखील राष्ट्र सेविका समितीचे कार्य करतात आणि आपला गाण्याचा छंद देखील जोपासतात.

लेखनाच्या आवडीतून त्यांनी विविध वृत्तपत्रांमधून प्रवासवर्णन तसेच स्फूटलेखनही केले. या आवडीतूनच त्यांनी ‘मी शांडिल्यगोत्री’ हे प्रवास वर्णन-ललित लेख, प्रवासवर्णनावर आधारित पुस्तक देखील प्रकाशित केले.

लहानपणी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना देखील महेंद्र यांचे आईवडील त्यांना नियमितपणे फिरायला घेऊन जायचे. त्यातूनच पुढे महेंद्र यांनी फिरण्याचा छंद जोपासला. या छंदातून स्वत:साठी आनंद मिळवीत असतानाच आपल्या आजूबाजूच्या जेवढय़ा शक्य आहे, तेवढय़ा सर्व मंडळींना आनंद देता यावा म्हणून वसा घेतलेले शेंडे यांच्याशी गप्पा मारणे, त्यांच्या जीवनप्रवासातील अनुभव ऐकणे ही देखील त्यांना भेटणाऱ्यांसाठी आनंदाची पर्वणीच असते. अशा अवलियाशी ९५२७५२१९८० या क्रमाकांवर संपर्क साधता येईल आणि अनुभवसमृद्ध होता येईल.

shriram.oak@expressindia.com