पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येत असलेल्या भोसरी विधानसभा मतदारसंघातील चिखली, कुदळवाडी आणि जाधववाडी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर मध्यरात्री कारवाई केली. या कारवाईमध्ये चार हजार ३३६.२८ चौरस फूट क्षेत्रफळावरील अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. त्यात दोन मंदिरे आणि दोन मशिदीचा समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर आता भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी याबाबत एक्सवर पोस्ट केली आहे.
भाजप आमदार महेश लांडगे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने कुदळवाडी आणि परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर सोमवारी पहाटे बुलडोझर चालवला. वास्तविक “देशविघातक प्रवृत्तींना आश्रय देणाऱ्या बेकायदेशीर प्रार्थनास्थळांवर कारवाई होणे आवश्यक होते. राष्ट्र सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही तडजोड केली जाणार नाही. या कारवाईत काही हिंदू धार्मिक स्थळांचेही नुकसान झाले आहे, याची खंत आहे. मात्र, ती अधिकृत जागी नियमांनुसार पुनर्स्थापित करण्यासाठी पुढाकार घेणार आहोत.
राष्ट्र सुरक्षा, इंद्रायणी नदी प्रदूषण, पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठी अतिक्रमण कारवाई फेब्रुवारी २०२५ मध्ये झाली होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने ही कारवाई करण्याचे धाडस दाखवले होते. आगामी काळात कुदळवाडी परिसर अतिक्रमणमुक्त करून ‘ग्रोथ हब’ म्हणून विकसित करण्याचा शासनाचा मानस आहे.
वास्तविक, ‘‘कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. देशविघातक प्रवृत्तींना आश्रय देणाऱ्या कोणत्याही बेकायदेशीर बांधकामाला आम्ही समर्थन देणार नाही. या भागातील नागरिकांनी कोणतीही धार्मिक तेड निर्माण न करता पोलीस व महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे. पिंपरी-चिंचवड शहरात कायदा व सुव्यवस्था राखवण्याकामी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन करतो. जय श्रीराम.. जय संविधान..!
