scorecardresearch

पिंपरीत महेश झगडे यांच्या कार्यक्रमात औषध विक्रेत्यांचा गोंधळ

अनेकदा खडाजंगी झाली. तरी झगडे यांनी रेटून आपले म्हणणे परखडपणे मांडले. गोंधळ थांबत नसल्याने पोलिस आले. तथापि, शाब्दिक वादापलीकडे प्रकरण गेले नाही. ‘

पिंपरीत महेश झगडे यांच्या कार्यक्रमात औषध विक्रेत्यांचा गोंधळ

अन्न व औषध प्रशासन आणि औषध विक्रेत्यांमध्ये असलेली दरी मिटवून थेट संवाद साधण्यासाठी आयुक्त महेश झगडे यांच्या उपस्थितीत शनिवारी पिंपरीत झालेल्या मेळाव्यात बराच गोंधळ झाला. झगडे यांच्या भाषणात सतत अडथळे आणण्याचा तसेच लांबलेले त्यांचे भाषण बंद करण्याचा प्रयत्न झाला. अनेकदा खडाजंगी झाली. तरी झगडे यांनी रेटून आपले म्हणणे परखडपणे मांडले. गोंधळ थांबत नसल्याने पोलिस आले. तथापि, शाब्दिक वादापलीकडे प्रकरण गेले नाही. ‘सांस्कृतिक’नगरीत अशाप्रकारे ‘सन्मान’ दिल्याबद्दल झगडेंनी तीव्र नाराजीही व्यक्त केली.
पिंपरीतील आचार्य अत्रे मंदिरातील कार्यक्रमात सहआयुक्त बी. आर. मासाळ, ओ. एस. सदवानी आदींसह मोठय़ा संख्येने औषध विक्रेते उपस्थित होते. प्रारंभी झगडे मनोगत मांडतील व त्यानंतर प्रश्नोत्तरे होतील, असे नियोजन होते. नर्मविनोदी शैलीत चिमटे काढत, तर कधी कानउघडणी करत आणि वेळप्रसंगी कठोर पावित्रा घेत झगडेंनी प्रशासनाची भूमिका मांडली. औषध विक्रेत्यांच्या संघटनेविषयी तसेच त्यांच्या संपाविषयी भाष्य करताच गोंधळ सुरू झाला. संघटनेविषयी काही बोलू नका, आमच्या नेत्यांना खोटे ठरवू नका, असा आरडाओरडा सुरू झाला. तेव्हा मी संघटनेच्या विरोधात नाही. प्रशासन व औषध विक्रेत्यांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न आहे. मी पाकिस्तानी, बांगलादेशी नाही. झगडेविषयी तुमच्या डोक्यात जे काही असेल ते काढून टाका. माझे ऐकून घ्या, असे ते सांगत होते. मात्र, वेगवेगळ्या मुद्दय़ांवर ते बोलत असताना अडथळे आणले जात होते. गोंधळ वाढल्याने नाटय़गृहातून पोलिसांना दूरध्वनी गेला. पोलीस घटनास्थळी आले, त्यानंतरही खडाजंगी सुरू होती. जवळपास तीन तास झगडे विविध मुद्दय़ांवर बोलत होते.
झगडे म्हणाले, या ठिकाणी गोंधळ होणार, याची पुरेपूर कल्पना होती. तरीही सर्वाना एकत्र आणून संवाद साधण्यासाठी आलो. आयुक्त ब्रह्मज्ञानी नसतो, त्याच्यापर्यंत तक्रारी आल्यास कारवाई होईल. कायदे पाळले गेले पाहिजेत. चुकीचे काम करणाऱ्या फक्त साडेचार टक्के लोकांवर कारवाई होते. मात्र, तरीही उर्वरित ९५ टक्के गहजब करतात. राज्यात ८५ टक्के व्यावसायिक प्रामाणिकपणे काम करतात. मात्र, १५ टक्के व्यावसायिकांमुळे गालबोट लागते. त्या अप्रामाणिकांना सुधारणे किंवा व्यवसायाबाहेर घालवणे गरजेचे आहे. आपण कसलीही बेबंदशाही चालू देणार नाही. ‘एफडीआय’चे भूत मनातून काढून टाका, तसे होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, औषध विक्रेत्यांवर ‘टार्गेट’ ठरवून कारवाई केली जाते, अशी तक्रार केली. हॉटेल व्यावसायिक, गुटखा विकणारे, अन्नातील विषबाधेला जबाबदार असणारे मोकाट सुटलेले आहेत. तुम्हाला कारवाईसाठी फक्त फार्मासिस्ट दिसतात का, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-07-2014 at 03:00 IST

संबंधित बातम्या