पुणे : बेरोजगार युवक-युवतींसाठी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत आता नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. कंपनीत तरुणांना इंटर्नशिप म्हणजेच कार्यप्रशिक्षण मिळणार असून त्यांना मासिक मानधनही दिले जाणार आहे. आज यासाठी कंपनीने मेळाव्याचे आयोजन केले आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे.

या मेळाव्याचे आयोजन महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, गेट क्रमांक २, महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड, चाकण येथे आज करण्यात आले आहे. या मेळाव्याअंतर्गत बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ५०० तर आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी १० अशा एकूण ५१० जागा उपलब्ध आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना ६ ते ९ महिन्यांच्या कालावधीसाठी दरमहा ९ हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कंपनीकडून प्रमाणपत्रही प्रदान करण्यात येणार आहे. उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते २५ वर्ष आहे.

इच्छुक उमेदवारांनी अद्ययावत बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्रे, झेरॉक्स प्रती, आधार कार्ड अथवा जन्मदाखला, तसेच पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत आणावेत, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त सुरेश वराडे यांनी केले आहे.

इस्रायलमध्ये नोकरीची संधी

राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या (एसएसडीसी) माध्यमातून आता देशातील नागरिकांना इस्रायलमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यात आता महाराष्ट्राच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने पुढाकार घेतला आहे. केंद्र सरकारकडून इस्रायल सरकारच्या सहकार्याने ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. इस्रायलमध्ये प्रामुख्याने घरगुती मदतनीस म्हणजेच ‘होम बेस्ड केअरगिव्हर’ या क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २५ ते ४५ वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावा तसेच इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान आवश्यक आहे.याशिवाय केअरगिव्हर किंवा परिचर्या संबंधित प्रशिक्षण (जीडीए, एएनएम, जीएनएम, बीएससी नर्सिंग) असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे किमान तीन वर्षे वैध पारपत्र असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती https://maharashtrainternational.com⁠ या संकेतस्थळावरील ‘लेटेस्ट जॉब्स’ या विभागात उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त सु.रा. वराडे यांनी केले आहे.