मेळघाट या आदिवासी क्षेत्रातील नागरिकांना सरकारच्या घरकुल योजनेद्वारे पक्की घरे मिळणार आहेत. मात्र, या घरकुल योजनेमध्ये सहभागी होऊन येथील लोकांना चांगली आणि आरोग्यपूर्ण घरे मिळवून देण्यासाठी ‘मैत्री’ या स्वयंसेवी संस्थेने बांधकाम व्यावसायिकांना आवाहन केले आहे.
सरकाला समांतर भूमिका न घेता पूरक भूमिका घेऊन ‘मैत्री’ ही संस्था काम करीत असून, आजवर अनेक विषयांवर या स्वरूपाची विधायक कामे करण्यामध्ये योगदान दिले आहे. आता संस्थेने घरबांधणीमध्येही काम करण्याचे निश्चित केले असून, त्यासाठी बांधकाम व्यावसायिकांना ‘मैत्रि’पूर्ण आवाहन केले आहे. यासंदर्भात शनिवारी (४ एप्रिल) कर्वेनगर येथील नटराज सोसायटीमधील मैत्री संस्थेच्या कार्यालयामध्ये (दूरध्वनी क्र. ०२०-२५४५०८८२) सायंकाळी साडेपाच वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे.
यासंदर्भात विनिता ताटके म्हणाल्या, घरबांधणी संबंधामध्ये माहिती आणि कौशल्य असलेल्या वास्तुविशारद (आर्किटेक्ट), सिव्हिल इंजिनिअर किंवा बांधकाम क्षेत्रातील कोणतेही काम करणाऱ्या व्यक्ती या प्रकल्पामध्ये मदत करू शकतात. काही दिवस मेळघाटामधील गावांमध्ये जाऊन आणि अगदीच तेथे जाणे शक्य नसल्यास पुण्यात राहूनही ही मदत करता येणे शक्य आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये हे काम करावयाचे आहे. या घरकुल योजनेंतर्गत भविष्यातही घरे बांधली जाणार असल्याने ज्यांना आता शक्य होणार नाही ते बांधकाम व्यावसायिक पुढच्या टप्प्यामध्येही सहभागी होऊ शकतात. या योजनेनुसार प्रत्येक घरासाठी शौचालय बांधणे अनिवार्य आहे. ते बांधून झाल्याशिवाय सरकारकडून मिळणाऱ्या प्रस्तावित आर्थिक मदतीचा पुढचा हप्ता लोकांना मिळणार नाही. घराची रचना ठरविण्याबाबत लोकांना स्वायत्तता दिली असून, केवळ मिळालेल्या रकमेचे साहित्य घरबांधणीमध्ये वापरल्याचा पुरावा द्यायचा आहे. त्यामध्ये स्वत:ची भर घालून ते आणखी चांगल्या दर्जाचे घर बांधू शकतात. अशा घरांची रचना ठरविणे, योग्य आणि कमी खर्चिक बांधकाम साहित्याची निवड यासाठी बांधकाम व्यावसायिक कोरकूंना मदत करू शकतात. ही घरे लोक स्वत:च बांधणार आहेत. हे बांधकाम कंत्राटदाराकडे सोपविले जाणार नसल्याने तेथे पुरविल्या जाणाऱ्या मदतीचा थेट लाभ कोरकूंनाच मिळणार आहे. तरी या योजनेमध्ये सहकार्यासाठी मैत्रीचा हात पुढे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.