scorecardresearch

दहीहंडीनिमित्त आज मध्यभागातील प्रमुख रस्ते वाहतूकीस बंद ;  शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्त्यावर वाहतूक बदल ; शहरात कडक बंदोबस्त

वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.

दहीहंडीनिमित्त आज मध्यभागातील प्रमुख रस्ते वाहतूकीस बंद ;  शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्त्यावर वाहतूक बदल ; शहरात कडक बंदोबस्त
दहीहंडी (संग्रहित फोटो)

पुणे : दहीहंडीनिमित्त शहरातील शुक्रवारी सायंकाळी पाचननंतर मध्यभागातील शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता वाहतूकीस बंद राहणार आहे. दहीहंडी उत्सवानिमित्त शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

दहीहंडी उत्सवानिमित्त मध्यभागातील मंडई; तसेच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे शुक्रवारी (१९ ऑगस्ट) सायंकाळी पाचनंतर शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता; तसेच बुधवार चौक ते दत्तमंदिर चौक, बेलबाग चौक ते सेवासदन चौक, टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषद चौक, नवी पेठेतील रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.

शिवाजी रस्त्यावरुन स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी स. गो. बर्वे चाैकातून (माॅडर्न कॅफे) जंगली महाराज रस्ता, खंडोजीबाबा चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. पूरम चौकातून बाजीराव चौकातून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी टिळक रस्ता, अलका टाॅकीज मार्गे इच्छितस्थळी जावे. स. गो. बर्वे चौकातून महापालिका भवनकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी जंगली महाराज रस्ता, झाशी राणी चौकातून इच्छितस्थळी जावे. बुधवार चौकातून अप्पा बळवंत चौकाकडे जाण्यास वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे वाहनांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे. वाहनचालकांनी बाजीराव रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे.

गर्दीच्या ठिकाणांवर पोलिसांची नजर

शहर तसेच उपनगरात दहीहंडी उत्सव साजरा करणारी लहान मोठी ९६१ मंडळे आहेत. शहरातील मध्यभागासह वेगवेगळ्या भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) तुकड्या, गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तास राहणार आहेत.

नियमांचे पालन करण्याचे आवाहन

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री दहा वाजेपर्यंत ध्वनीवर्धकाचा वापरास परवानगी देण्यात आली आहे. मंडळांनी नियमांचे पालन करुन दहीहंडी उत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या