नगरसेवकांच्या आरोप-प्रत्यारोपांनी खालची पातळी गाठली पिंपरी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तानाजी खाडे आणि भाजपच्या नगरसेविका सीमा सावळे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. ‘अरे-तुरे’ची भाषा करत असंसदीय शब्दांचा मारा करत दोघांमध्ये झालेल्या आरोप-प्रत्यारोपांनी खालची पातळी गाठली. वारंवार सांगूनही दोघांनीही शिस्त न पाळल्याने संतापलेल्या महापौरांनी त्या दोघांना बाहेर जाण्याचे आदेश दिले. तर, हा गोंधळ पाहून आयुक्त कानाला मोबाइल लावून सभेतून निघून गेले. महापौर शकुंतला धराडे यांच्या अध्यक्षतेखाली तहकूब सभेचे कामकाज सुरू झाले. ‘सर्वासाठी घरे योजना’ या विषयावर चर्चा सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम त्यांच्यात खटका उडाला. मात्र, तेव्हा वाद होता-होता राहिला. मात्र, पुढच्याच विषयावरील चर्चा सुरू झाल्यानंतर व्हायचे तेच झाले व दोघांमध्ये भडका उडाला. निगडी पेठ क्रमांक २२ येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात घुसखोरी व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सावळे यांनी यापूर्वी केला आहे. त्या घोटाळ्यात नगरसेवकांचा सहभाग असल्याचा आरोपही केला होता. याप्रकरणी नगरसेवकांची नाहक बदनामी केली जाते. ‘पेड न्यूज’द्वारे नगरसेवकांची बदनामी केली जाते, असा संशय खाडे यांनी सभेत बोलताना व्यक्त केला. ठेकेदारांशी तडजोड होऊ शकली नाही म्हणून न्यायालयात गेल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यानंतर, साळवे यांनी खाडे यांचा निषेध केला. या वेळी खाडे यांनी दंड थोपटल्याने सावळे संतापल्या व त्या खाडे यांच्या अंगावर धावून गेल्या. पक्षनेत्या मंगला कदम यांनी त्यांना वेळीच थांबवले. यादरम्यान महापौर त्यांना वारंवार शांत राहण्याच्या सूचना देत होत्या. मात्र, दोघेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. एकमेकांना उद्देशून त्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू होते. त्यामुळे महापौर संतापल्या. सभागृहाच्या शिस्तीचे पालन होत नसल्याचे सांगत त्यांना बाहेर जाण्यास महापौरांनी बजावले. हा सगळा प्रकार आयुक्त दिनेश वाघमारे पाहत होते. त्यात न पडता त्यांनी कानाला मोबाइल फोन लावला व सभागृहातून बाहेर निघून गेले. थोडय़ाच वेळेत सभा संपली. मात्र, त्यानंतरही खाडे-सावळे यांचे भांडण सुरूच होते. त्यामुळे पालिका वर्तुळात तणावाचे वातावरण होते.