पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) प्रशिक्षण घेणारा कॅ डेट महंमद सुलतान अहमद या मालदिव येथील विद्यार्थ्यांचा शनिवारी मृत्यू झाला.  एनडीएमध्ये सुरू असलेल्या नियमित प्रशिक्षणात सहभागी झालेला महंमद अचानक कोसळला. त्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचे निधन झाले. मृत्यूचे नेमके  कारण शोधण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. एनडीएकडून शनिवारी रात्री प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत माहिती देण्यात आली आहे.

महंमद हा एनडीएच्या १४५ व्या तुकडीमध्ये शिक्षण घेत होता. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.