आंबेगाव तालुक्यातील माळीण गावातील मातीचे ढिगारे उपसण्याचे काम पाचव्या दिवशीही युद्धपातळीवर सुरू असून रविवारी संध्याकाळपर्यंत एकूण १०५ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सध्या सापडणारे मृतदेह अत्यंत खराब अवस्थेत असल्याने त्यांची ओळखही पटविणे कठीण झाले आहे. या मृतदेहांवर जागीच शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. सातत्याने पडणारा पाऊस व दुर्गंधीमुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न कायम आहे. ढिगारा उपसण्याचे काम ६० टक्के पूर्ण झाले आहे. दरम्यान, दुर्घटनेतून वाचलेली ४५ घरे खाली करण्याच्या नोटिस प्रशासनाने दिल्या असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने या नागरिकांना इतरत्र हलविण्यात येणार आहे.
गावावर कोसळलेल्या महाकाय कडय़ामुळे गावाचा काही भाग व त्याच्यासोबत स्थानिक ग्रामस्थ डोंगराच्या खालच्या बाजूला असलेल्या ओढय़ापर्यंत फेकले गेले असावेत. त्याचप्रमाणे खोदकामातून निघणारी माती व दगड ओढय़ाच्या बाजूलाच लोटले जात असल्याने त्या बाजूलाच सुमारे पन्नास मृतदेह असावेत असा दाट संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. मातीच्या ढिगाऱ्यात गाडले गेलेल्या मृताचे नातेवाईक घटनास्थळी ठाण मांडून आहेत. मृतदेह बाहेर काढल्यानंतर आपला तो नातेवाईक आहे की काय याची खातरजमा ते करीत असल्याचे दिसून येत होते.
 मातीचे ढिगारे उपसताना पडलेली घरे व त्यातील मृतदेह ढिगाऱ्याखालीच असल्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. त्याचप्रमाणे घटनेच्या दिवशी मारुती मंदिरात असलेली सुमारे २५ ते ३० मुले मातीच्या ढिगाऱ्याखाली असावीत, अशी भीती पहिल्या दिवसापासून ग्रामस्थ व्यक्त करीत होते. यातील फार कमी मुलांचे मृतदेह हाती लागले आहेत. ही सर्व मुले तसेच अनेक ग्रामस्थ गावच्या या खालच्या बाजूला असलेल्या डोंगरउतारावर १० ते १२ फूट साचलेल्या चिखलात गाडली गेली असावीत, अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
गावात स्थानिक १५१ लोक होते. पाहुणे १५ व इतर अशी एकूण १६५ ते १७० जण या आपत्तीमध्ये असण्याचा अंदाज असून आवणीसाठी मुंबई-पुण्याकडील पाहुणे येथे आलेले होते. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळत असल्याने गावात व आजूबाजूच्या गावात आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन मृतदेह बाहेर न काढण्याचा निर्णय काही वेळेस प्रशासनाला घ्यावा लागेल, असे बोलले जात आहे.
   याबाबत जिल्हाधिकारी सौरभ राव म्हणाले, ‘‘ घटना घडली त्या दिवशी एनडीआरएफच्या जवानांनी सर्व भागाची दोन तास तपासणी केली, त्यानंतरच माती खाली लोटायचा निर्णय घेतला. गावातील पाहणी श्वानपथकाकडून केली होती. शोधकार्य आणखी तीन दिवस तरी चालेल.’’
दुर्गंधीमुळे शोधकार्यातील जवान आजारी
दुर्गंधी, सातत्याने पडणारा पाऊस तसेच सलग पाच दिवस एकाच ठिकाणी काम करून राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवान आणि पोकलन मशिनरीचे ऑपरेटर आजारी पडत आहेत. सध्या १२ जेसीबी ऑपरेटर आजारी पडलेले असून ते उपचार घेत आहेत. या जवानांना तातडीची मदत मिळावी म्हणून जुन्नर-आंबेगाव-खेड तालुका केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने औषधे आणि आरोग्य संरक्षण साहित्याचे वाटप करण्यात येत आहे.