पिंपरी : पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात केरळ राज्यातील मल्याळम् भाषेतील ‘मलवाझी’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान पटकाविला. मराठी भाषेतील ‘अ स्टोरी कार्वेड ऑन अ ट्री’ या लघुपटाने सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्कार पटकाविला. ॲनिमेशन विभागात राजस्थान येथील ‘द वेट वॉल’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन फिल्मचा मान मिळवला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने आणि पिंपरी-चिंचवड फिल्म सोसायटी, गाथा फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे बक्षीस वितरण महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते आकुर्डीत झाले. महोत्सवात भारतासह जर्मनी, इटली, स्पेन, पोलंड, ब्राझिल, यूएई यासह ४३ देशांमधील ११६ पेक्षा अधिक चित्रपट, लघुपट, माहितीपट, ॲनिमेशन चित्रपट आणि ६० सेकंदांचे चित्रपट प्रदर्शित करण्यात आले.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार दुलाल रॉय व प्रणव जोशी यांना, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिथिला हिरेमठ यांना प्रदान करण्यात आला. ‘साबर बोंडं’ या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहन कानवडे यांना ‘पीसीआयएफएफ युवा प्रेरणादायी सिने आयकॉन पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. चित्रपट, लघुपट, माहितीपट, ॲनिमेशन, व्हिडिओ सॉंग आणि ६० सेकंद चित्रपट अशा विविध विभागांमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले.
‘क्रांतिज्योती विद्यालय’ चित्रपटाने सांगता
चित्रपट महोत्सवाचा समारोप ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ या चित्रपटाने झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महोत्सवाच्या समारोपावेळी हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपट रसिकांची विशेष उपस्थिती लाभली. तीन दिवस रंगलेल्या या चित्रपट महोत्सवात विविध भाषांतील आणि विषयवैविध्य असलेल्या चित्रपटांचा आस्वाद विविध वयोगटांतील चित्रपट रसिकांनी घेतला.
चित्रपट महोत्सवाला यंदा शहरातील चित्रपट रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला. या महोत्सवात ४३ देश सहभागी झाले होते. शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा हा महोत्सव आहे. चित्रपट ही केवळ सर्जनशीलतेची नव्हे, तर प्रगल्भ विचारांची खिडकी असून, या महोत्सवाच्या माध्यमातूनपिंपरी-चिंचवडमध्ये चित्रपट संस्कृतीला चालना मिळत आहे, असे क्रीडा विभागाचे उपायुक्त पंकज पाटील यांनी सांगितले.
