पुणे : कर्ज फेडण्यासाठी चुलतभावाच्या घरी चोरणाऱ्या तरुणाला मुंढवा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सोन्याचे दागिने आणि एक किलो चांदी असा २२ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. आशुतोष अशोक कासवा (वय ३८, रा. मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एकाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदाराच्या सदनिकेतून ५ फेब्रुवारी रोजी साेन्याचे दागिने, एक किलो चांदी, तसेच दोन लाख रुपयांची रोकड असा ऐवज लांबविण्यात आल्याची घटना घडली होती.

पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले होते. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, पाेलिसांनी आरोपी आशुतोष याला ताब्यात घेतले. चैाकशीत त्याने चुलतभावाच्या घरी चोरी केल्याची माहिती दिली. कर्ज फेडण्यासाठी त्याने चुलतभावाच्या घरी चोरी केल्याची कबुली दिली. पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक, सहायक निरीक्षक गणेश पिंगुवाले, उपनिरीक्षक युवराज पोमण, राजू कदम, शिवाजी जाधव, योगेश गायकवाड, राहुल मोरे, राहुल धोत्रे,, शिवाजी धांडे, अक्षय धुमाळ, स्वप्नील रासकर यांनी ही कामगिरी केली.

सोमवार पेठ, मार्केट यार्ड भागात घरफोडी

शहरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. मध्य भागातील सोमवार पेठेतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी २८ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली, तसेच मार्केट यार्ड भागात एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख ६३ हजार रुपयांचे दागिने लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला.

सोमवार पेठेतील आगरकर शाळेजवळ असलेल्या एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड, सोन्याचे दागिने असा २८ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत एकाने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक आणि कुटुंबीय हे सोमवार पेठेतील पन्ना सोसायटीत राहायला आहेत.

८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी शयनगृहातील कपाटातून २८ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, सहायक पोलीस निरीक्षक राऊत तपास करत आहेत.

मार्केट यार्ड भागातील एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख पाच हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली. याबाबत एकाने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे रुणवाल पार्क सोसायटीतील सदनिकेत राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून ऐवज लांबविल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस उपनिरीक्षक गडगडे तपास करत आहेत.