पुणे : वादातून सोसायटीतील वाहने पेटवून देणाऱ्या एकाला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली. धानोरीतील एका सोसायटीच्या आवारात ही घटना घडली. विशाल राजेश खलसे (वय १९, रा. परांडेनगर, धानोरी ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडीतील धानोरी रस्त्यावर प्रियांश अपार्टमेट आहे. तक्रारदार तरुणाची आरोपी खलसे याच्याशी भांडणे झाली होती. त्यानंतर खलसे हा प्रियांश अपार्टमेंटच्या आवारात १३ मार्च रोजी पहाटे चारच्या सुमारास आला. त्याने सोसायटीतील तळमजल्यावर लावलेल्या वाहनांना आग लावली.
आगीत सहा वाहनांचे नुकसान झाले, तसेच सोसायटीतील तळमजल्यावर असलेल्या वीज वाहिनीला आगीची झळ पोहोचली. सोसायटीच्या आवारातील वस्तू आगीत जळाल्या. आगीच्या घटनेची रहिवाशांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. तक्रारदार तरुणाने आरोपी खलसे याच्यावर संशय व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी तपास करुन खलसे याला ताब्यात घेतले. चौकशीत तक्रारादाराशी झालेल्या भांडणातून वाहने पेटवून दिल्याची कबुली आरोपी खलसे याने पोलिसांना दिली. पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले तपास करत आहेत.
उपाहारगृहातील रोखपालाकडून एक लाखांची रोकड लंपास
बंडगार्डन रस्त्यावर असलेल्या एका उपाहारगृहातील रोखपालाने गल्ल्यातील एक लाख रुपयांची रोकड चोरल्याची घटना उघडकीस आली. याबाबत उपाहारगृह मालकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रोखपालाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे बंडगार्डन रस्त्यावर उपाहारगृह आहे. आरोपी त्यांच्यकडे रोखपाल म्हणून काम करत होता. आरोपीने लक्ष नसल्याची संधी साधून वेळोवेळी एक लाख रुपयांची रोकड चोरल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता तपास करत आहेत.
दवाखान्यातून एक लाख ६० हजारांची रोकड चोरी
शुक्रवार पेठेतील साठे काॅलनी परिसरात असलेल्या एका खासगी दवाखान्यातून चोरट्यांनी एक लाख ६० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका डाॅक्टरांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदारा हे दंतवैद्यक तज्ज्ञ आहेत. चोरट्यांनी दवाखान्यातील खिडकीतून आत प्रवेश केला. दवाखान्यातील कपाटात ठेवलेली एक लाख ६० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पसार झालेल्या चोरट्याचा शोध घेण्यात येत असून, पोलीस हवालदार हर्षल दुडम तपास करत आहेत.
