पिंपरी : रावेत येथे आईच्या प्रियकराने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलीने शाळेतील वर्गशिक्षीकेला आपल्यावरील अत्याचाराबाबत माहिती दिल्यानंतर शाळेने पोलिसांच्या दामिनी पथकाला बोलावून हा प्रकार सांगितला. रावेत पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला गजाआड केले.
पंकज बाबुराव धोत्रे (वय ४५, रा. हांडेवाडी, हडपसर) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी १४ वर्षीय पिडीत मुलीने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रावेत ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांनी याबाबत माहिती दिली. पीडित मुलीचे आई आणि वडील गेल्या सहा वर्षांपासून विभक्त राहतात. पीडित मुलगी आणि तिचा भाऊ आईसोबत रावेत येथील एका सोसायटीमध्ये वास्तव्यास आहेत. मुलगी देहूरोड येथील एका शाळेत सहावीच्या वर्गात शिकते. आरोपी पंकज हा एका कंपनीत व्यवस्थापक म्हणून कामाला आहे. तो विवाहित असून त्यालाही मुले आहेत. तर, मुलीची आई एका बँकेत नोकरी करते.
मुलीची आई आणि पंकज यांच्यात २०१९ पासून प्रेमसंबंध आहेत. पंकज आठवड्यातून चार ते पाच वेळा मुलीच्या घरी येतो. आई घरी नसताना पंकजने वर्षभरापूर्वी मुलीसोबत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार मुलीने आईला सांगितला. मात्र, तिने त्याकडे दुर्लक्ष केले. मुलगी घरी एकटीच असताना आठ ऑगस्ट रोजी पंकजने मुलीशी पुन्हा अश्लील चाळे केले. मुलीने आरडाओरडा केल्यानंतर त्याने तिला सोडले. २८ ऑगस्ट रोजी मुलीने शाळेत गेल्यानंतर आपल्यावर बेतलेला प्रसंग वर्गशिक्षिकेला सांगितला. प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षिकेने त्वरित प्राचार्यांना याबाबत माहिती दिली. प्राचार्यांनी पोलिसांच्या दामिनी पथकातील महिला पोलीस कर्मचाऱ्याला बोलावून घेतले आणि मुलीसोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल करून आरोपी पंकज याला अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक संदीप देशमुख तपास करीत आहेत.