सासरकडील छळामुळे तरुणाने गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी,सासू, सासऱ्यांसह सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तेजस तानाजी चाळेकर (वय २७, रा. बिबवेवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत तेजसची आई शीला तानाजी चाळेकर (वय ४७, रा. नसरापूर, ता. भोर) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी ऐश्वर्या विजय पिंगळे, विजय नामदेव पिंगळे, शीतल विजय पिंगळे (सर्व रा. पौड, ता. मुळशी), ऋषीकेश उर्फ भाई सुनिल खेडकर, सुनील शिवलिंग खेडकर, भूषण सुनील खेडकर (रा. नसरापुर, ता. भोर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> पुणे: जखमी तरूणाला उपचाराऐवजी खड्डयात गाडून पुरण्याचा प्रकार, सिंहगड रस्ता पोलिसांकडून दोघेजण ताब्यात

बिबवेवाडी भागात आशा, त्यांचे पती मोठा मुलगा तेजस आणि लहान मुलासोबत राहायला होते. ८ ऑगस्ट २०२० मध्ये प्रेमसंबधातून तेजस आणि ऐश्वर्या यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. त्यानंतर तेजसच्या आई-वडिलांनी धार्मिक रितीरिवाजानुसार दोघांचा विवाह केला. विवाहानंतर तेजस आणि ऐश्वर्या यांच्यात वाद होऊ लागले. कराेना संसर्ग काळात तेजसचा व्यवसाय बंद पडला. त्यानंतर ऐश्वर्याला घेऊन तिचे आई-वडील माहेरी आले. चार महिने माहेरी राहिल्यानंतर ती पुन्हा सासरी नांदण्यास आली. अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर तेजस आणि ऐश्वर्या यांच्यात पुन्हा वाद सुरू झाले. ऐश्वर्याने आई-वडिलांना तेजसच्या घरी बोलावून घेतले. तेथे त्यांनी गोंधळ घातला. आई-वडिलांच्या सांगण्यावरुन ऐश्वर्याने घटस्फोट, तसेच पोटगीसाठी न्यायालायत दावा दाखल केला. ऐश्वर्याच्या आई-वडिलांच्या सांगण्यावरुन ऋषीकेश खेडकरने तेजसचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. सुनील खेडकर आणि भूषण खेडकर यांनी तेजसला त्रास देण्यास सुरुवात केली. त्रासामुळे तेजस, त्याच्या आई-वडिलांनी घर बदलले. बिबवेवाडीतील घर सोडून ते इंदिरानगर भागात राहायला गेले. घरी कोणी नसताना तेजसने ९ ऑगस्ट रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, असे तेजसचे आई आशा चाळेकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक निकुंभ तपास करत आहेत.