पुणे : महापालिका भवन परिसरात दुचाकीस्वार तरुणाला धमकावून चोरट्यांनी त्याच्या गळ्यातील ३० हजारांची सोनसाखळी चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका तरुणाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण आळंदी रस्त्यावरील कळस परिसरात राहायला आहे. दुचाकीस्वार तरुण बुधवारी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास महापालिका भवन परिसरातून निघाला होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी तरुणाला अडवले. त्याला धमकावून गळ्यातील सोनसाखळी चोरून दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक संजय पांढरे तपास करत आहेत. दोन दिवसांपूर्वी लक्ष्मी रस्त्यावर दुचाकीस्वार तरुणाला धमकावून चोरट्यांनी त्याच्या गळ्यातील ६० हजारांची सोनसाखळी चोरून नेल्याची घटना घडली होती.