पुणे : समाज माध्यमातून झालेल्या ओळखीतून तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. विवाह झाल्याचे लपवून तरुणाने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. याप्रकरणी तरुणाविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

अमित अंकुश नप्ते (वय २९, रा. करंदी, शिरूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका २९ वर्षीय तरुणीने फिर्याद शिवााजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणी आणि आरोपीची समाज माध्यमावर ओळख झाली होती. ओळखीतून त्यांच्यात मैत्रीसंबंध निर्माण झाले. आरोपीने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने तिला विवाहाचे आमिष दाखविले. त्यानंतर त्याने तरुणीवर हाॅटेलमध्ये नेऊन वेळोवेळी बलात्कार केला. तरुणीने त्याच्याकडे विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने टाळाटाळ सुरु केली.

हे ही वाचा…पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी सुरेंद्र अगरवाल याच्यावर गुन्हा,खासगी कंपनीतील कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

त्यानंतर आरोपी अमितचा विवाह झाल्याची माहिती तरुणीला मिळाली. त्याने तिला जाब विचारला. तेव्हा माझे पत्नीशी पटत नसून,लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे त्याने सांगितले. गावी नेऊन आई-वडिलांची भेट घालून देतो, अशी बतावणी त्याने केली. तिने पुन्हा विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने तरुणीला शिवीगाळ केली. माझी मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांशी ओळख आहे. तुझ्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करुन अडकवू, अशी धमकी त्याने तरुणीला दिली. घाबरसेल्या तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक सविता सपकाळे करत आहेत.