पुणे : पत्नीवर संशय घेत दोन साथीदारांच्या मदतीने पत्नीचे अपहरण करण्याचा प्रकार खराडी भागात घडला. मात्र, अपहरण झालेल्या महिलेला आरोपींनी मोटारीत बसविताच तिने स्वत:चा मोबाइल खाली फेकत आरडाओरड केली. त्यामुळे नागरिकांनी याबाबतची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. पोलिसांनीही तत्परता दाखवत अवघ्या आठ तासांत फलटण येथे आरोपींना पकडले आणि महिलेची सुटका केली.
अमोल देवराव खोसे (वय २४, रा. परतूर, जालना), महादेव निवृत्ती खानापुरे (वय २२) आणि ज्ञानेश्वर बबन पांजगे (सर्व रा. परतूर, जालना) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शिल्पा अमोल खोसे (वय २६, रा. खराडी) असे सुटका केलेल्या महिलेचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पा आणि अमोल हे विवाहापूर्वी काही दिवस एकत्र राहत होते. काही महिने एकत्र राहिल्यानंतर त्यांनी विवाह केला. मात्र, अमोल तिच्यावर संशय घेऊ लागला. त्यातून दोघांत वादावादी सुरू झाली. त्याला कंटाळून शिल्पा दुसरीकडे राहू लागली. त्याचा अमोलच्या मनात राग होता. त्यामुळे तिला जिवे मारण्याची योजना त्याने आखली.
अमोल जालना येथील मूळगावी गेला. तेथून मोटार आणि दोन साथीदार घेऊन आला. बुधवारी सकाळी शिल्पा खराडी भागात कामासाठी निघाली असताना अमोलसह महादेव आणि ज्ञानेश्वरने तिला जबरदस्तीने मोटारीत बसविले. तुला आज जिवंत सोडणार नाही, आज तुझा शेवटचा दिवस आहे, असे म्हणत तिचे अपहरण केले. या दरम्यान शिल्पाने आरडाओरड करीत मोबाइल खाली फेकला. हा प्रसंग पाहणाऱ्या नागरिकांनी तातडीने याबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पोलिसांनी तातडीने हालचाली केल्या.
तपास पथकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण आणि तांत्रिक पद्धतीचा वापर करीत आरोपांचा माग काढण्यास सुरुवात केली. पोलीस जेजुरीपर्यंत पोहोचले, पण आरोपींनी फलटण गाठले होते. मात्र, पोलिसांनी अखेर फलटणपर्यंत जात आठ तासांत आरोपींना जेरबंद केले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ निरीक्षक सुनील जाधव, सचिन कुटे, बंटी सासवडकर, संदीप येळे, गणेश हंडगर, सुभाष आव्हाड यांनी केली.