लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : दारु पिताना झालेल्या वादातून मेहुण्याच्या पोटात चाकू भोसकून त्याचा खुनाचा प्रयत्न केल्याची घटना कसबा पेठेत घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. अक्षय सुनील रिटे (वय २७) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अमित आनंदराज पिल्ले (वय ३३, रा. ९८९, कसबा पेठ) याला अटक केली आहे. याबाबत पूजा अमित पिल्ले (वय २७) हिने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी अमित एका दुकानात कामाला आहे. विसर्जन मिरवणुकीनिमित्त अक्षय बहिणीच्या घरी मंगळवारी सायंकाळी आला होता. अमित आणि अक्षय घरात दारु पित होते. त्यावेळी अचानक दोघांमध्ये वाद झाला. अमितने स्वयंपाक घरातील चाकू आणला. तो अक्षयवर धावून गेला. त्यावेळी त्याची पत्नी पूजाने मध्यस्थी केली. झटापटीत पूजाच्या हाताला चाकू लागला. पूजा बाजूला झाल्यानंतर अमितने मेहुणा अक्षयच्या पोटावर दोन ते तीन वेळा चाकूने वार केले.

आणखी वाचा-‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड – बोंडें’वर गुन्हे दाखल करा; काँग्रेस ची मागणी

विसर्जन मिरवणूक सुरू असतानाचा तरुणाला भोसकल्याची माहिती मिळताच फरासखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या अक्षयला रुग्णालयात दाखल केले. आरोपी अमितला खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक डुकरे तपास करत आहेत.