पुणे : एका व्यक्तीने मटण खाताना हाडे गिळली. त्याला नंतर अन्न गिळताना त्रास होऊ लागल्याने कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत त्याने सहा हाडे गिळल्याचे निष्पन्न झाले. ससूनमधील डॉक्टरांनी त्याच्यावर एंडोस्कोपीद्वारे इसोफॅगोस्कोपी करून अन्ननलिकेत अडकलेली हाडे यशस्वीपणे बाहेर काढली.ही ५२ वर्षीय व्यक्ती कोल्हापूरमधील आहे.

तिने मटण खाताना घास नीट न चावता गिळल्याने मटणाचे हाड अन्ननलिकेत अडकले. त्यामुळे या व्यक्तीला उलट्या, घशात दुखणे, अन्न व पाणी गिळण्यास त्रास होऊ लागला. कुटुंबीयांनी त्यांना कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात नेले. तेथून त्यांना तेथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, त्यांच्या अन्ननलिकेत अडकलेली हाडे आकाराने मोठी असल्याने ती काढण्याची शस्त्रक्रिया गुंतागुंतीची होती. त्यामुळे त्यांना पुण्यात ससून सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले.

ससून रुग्णालयाच्या कान, नाक व घसा शास्त्र विभागात या रुग्णाला दाखल करण्यात आले. तिथे त्यांचे सीटी स्कॅन करण्यात आले. त्यात रुग्णाच्या अन्ननलिकेच्या वरच्या भागात हाडे अडकल्याचे निष्पन्न झाले. एकूण ६ हाडे रुग्णाच्या अन्ननलिकेत अडकली होती आणि ती वेगवेगळ्या आकाराची होती. डॉक्टरांनी या रुग्णावर एंडोस्कोपीद्वारे इसोफॅगोस्कॉपी करून ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. हाडांची संख्या अधिक असल्याने आणि त्यांचा आकार मोठा असल्याने अन्ननलिकेला इजा होण्याची शक्यता होती. डॉक्टरांनी अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून कौशल्याने हा धोका टाळला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही शस्त्रक्रिया कान, नाक, घसा शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राहुल तेलंग आणि त्यांचे सहकारी डॉ. राहुल ठाकूर, डॉ. प्रणित खंडागळे, डॉ. आकृती नेमाणी, डॉ. प्रियांका शिंदे यांनी केली. या शस्त्रक्रियेसाठी लागणारी सामग्री ससून रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. यलप्पा जाधव यांनी उपलब्ध करून दिली. या शस्त्रक्रियेत भूलतज्ज्ञ विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. सुरेखा शिंदे व डॉ. विजय पाटील, डॉ. श्रीमॉल प्रसाद आणि परिचारिका दमयंती जाधव यांचाही सहभाग होता.