जुन्नर : कौटुंबिक वादातून आईने सहा वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकारात मुलाचा बुडून मृत्यू झाला. तत्पूर्वी महिलेले स्वत:च्या १३ वर्षांच्या मुलीचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी मंचर पोलिसांनी संबंधित महिलेविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. हर्षदा आशिष बाणखेले (वय ३५) असे महिलेचे नाव आहे. तिचा मुलगा निहांत (वय ६) याचा मृत्यू झाला. मुलगी परिज्ञा (वय १३) हिच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणखेले पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत होती. दोन-तीन महिन्यांपूर्वी भांडण झाल्यानंतर दोघे स्वतंत्र राहू लागले. पती आशिष हा आई-वडिलांकडे, तर हर्षदा ही मंचर येथे दोन मुलांसह राहत होती. त्यांच्यात वाद सुरूच होता. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता हर्षदा हिने मुलगी परिज्ञा हिचा घरामध्ये वायरच्या साह्याने गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. तिला हाताने लाथाबुक्याने मारहाण केली. गळा आवळल्यामुळे परिज्ञा बेशुद्ध होऊन निपचित पडली होती. ती मरण पावल्याचे समजून हर्षदा हिने घराला बाहेरून कुलूप लावले. सहा वर्षाचा मुलगा निहांत याला बरोबर घेऊन ती मोपेडवरून मंचर शहराजवळ असलेल्या तपनेश्वर स्मशानभूमी लगतच्या एका विहिरीवर गेली.

 निहांत याच्यासह तिने विहिरीत उडी मारली. त्यामध्ये निहांत याचा मृत्यू झाला. हर्षदा ही पाईपला धरून होती. त्यावेळी स्मशानभूमीत दशक्रिया विधी सुरू होता. एकजण लघुशंकेसाठी विहिरीजवळ गेला असता त्याच्या लक्षात हा प्रकार आला. त्याने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिक जमा झाले. संजय बाणखेले यांनी मदतीसाठी विहिरीत उडी घेतली. नगरसेवक वसंतराव बाणखेले, गणेश बाणखेले आणि ग्रामस्थ मदतीसाठी धावले. विहिरीतील दोघांना बाहेर काढून उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे निहांत याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

तिच्या पतीला ही माहिती कळविण्यात आली. तेव्हा मुलगी दिसली नाही. महिलेने मुलीलाही विहिरीत टाकल्याची शंका मदत करणाऱ्यांना आली. त्यामुळे शोधाशोध करण्यात आली. मात्र, मुलगी सापडली नाही. पतीकडे घराची चावी असल्याने तो घरी गेला. आतमध्ये मुलगी जखमी अवस्थेत मिळून आली. मुलीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

पती आशिष याने मंचर पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार हर्षदा हिच्याविरूद्ध खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा उपनिरीक्षक यादव पुढील तपास करत आहेत.