पिंपरी- चिंचवड शहरातील पूर्णानगर येथील सोसायटीत घडली आहे
पिंपरी- चिंचवडमध्ये वटपौर्णिमेच्या दिवशी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याची घटना उजेडात आली आहे. ही घटना पिंपरी- चिंचवड परिसरातील पूर्णानगर येथील सोसायटीत घडली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वटपोर्णिमा असल्याने अनेक महिला मौल्यवान सोन्याचे दागिने परिधान करतात याचाच फायदा घेऊन चोरट्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले आहे.
शनिवारी वटपोर्णिमेनिमित्त महिलांनी पारंपारिक पद्धतीने साडी परिधान करून सोन्याचे मौल्यवान दागिने घातले होते. महिला वटवृक्षाची पूजा करण्यासाठी जात होत्या. तेव्हा दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलांच्या गळ्यातील मौल्यवान सोन्याच्या दागिन्याची टेहळणी केली. मग, पुन्हा भरधाव दुचाकी वरून येत अज्ञातांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून धूम स्टाईल दुचाकी चालक आणि चोरटा पसार झाला आहे. या घटनेमुळे पूर्णा नगर येथील सोसायटीमध्ये खळबळ उडाली होती. या घटनेचा सीसीटीव्ही सोशल मीडिया वरती वायरल होत असून महिलांनी स्वतः सतर्क राहण्याची गरज असल्याचं संदेश देण्यात येत आहे.



