पुणे : ‘राज्य शासनाच्या ‘मॅग्नेट’ प्रकल्पाच्या माध्यमातून फळे, भाजीपाला,फुलांच्या विक्रीसाठी एक साखळी निर्माण करण्यात येणार आहे. जागतिक पातळीवर सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यात निर्माण करण्यात येणार आहे. जल, रेल्वे,वाहतूक, विमानतळ, तसेच महामार्गांशी ही बाजारपेठ जोडण्यात येणार आहे’, अशी घोषणा राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी शनिवारी केली.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि पुणे जिल्हा परिषदेकडून मार्केट यार्ड येथे ‘आंबा महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन रावल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे, संचालक शरद जरे, तसेच पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप या वेळी उपस्थित होते.
‘मार्केट यार्डातील बाजार आवारात देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था, महामंँगो यांच्याकडून आंबा उत्पादक शेतकरी ते ग्राहक अशी संकल्पना मांडण्यात आली. गेले २५ वर्ष पुण्यात आंबा महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. या महोत्सवात १५० शेतकरी सहभागी झाले आहेत. या महोत्सवाच्या माध्यमातून ग्राहक आणि आंबा उत्पादक शेतकरी यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे.
मुंबई आणि दिल्लीतही आंबा महाेत्सवाचे आयाजेन केले जाणार आहे. या महोत्सवात कोकणातील हापूस, केशर, पायरी, तसेच विविध वाणांचे आंबे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. हापूसला भौगाेलिक मानांकन (जीआय टॅगिंग) मिळाले आहे. मानांकनामुळे ग्राहकांना अस्सल हापूस मिळणार आहे. फसवणुकीची शक्यता अजिबात नाही,’ असे रावल यांनी नमूद केले.
‘राज्य शासनाच्या ‘मॅग्नेट’ प्रकल्पाच्या माध्यमातून फळे, भाजीपाला, फुले विक्रीची शृंखला निर्माण करण्यात येणार आहे. जागतिक पातळीवर सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यात स्थापन करण्यात येणार आहे. ही बाजार समिती जल, विमान वाहतुकीने जोडण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पणन मंडळाकडून मिलेट महोत्सव, आंबा महोत्सव, काजू , बेदाणे महोत्सव अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे’, असे त्यांनी सांगितले. संजय कदम यांनी प्रास्ताविक केले. विनायक कोकरे यांनी आभारप्रदर्शन केले.
‘नो यूूवर फार्मर’
‘आंबा विक्री व्यवहारात क्यूआर कोडचा वापर करण्यात येणार आहे. या माध्यमातून ग्राहकांना ग्राहकांना थेट आंबा उत्पादक शेतकऱ्याची माहिती मिळणार आहे. एखादे फळ खराब मिळाले तर त्याचा पाठपुरावा करणे ग्राहकाला शक्य होईल. ग्राहकांना हे फळही बदलून देण्यात येईल’, असे रावल यांनी सांगितले.
बारदानांचा तुटवडा; शेतकऱ्यांच्या तक्रारी
बारदानांचा (पोते) तुटवडा जाणवत असल्याच्या तक्रारी राज्यातील शेतकऱ्यांनी केल्या आहेत. हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. याबाबत जयकुमार रावल म्हणाले, ‘हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे.
याबाबत केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. ‘नाफेड’च्या (नॅशनल ॲग्रीकल्चरल कोऑपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया ) माध्यमातून शेतकऱ्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे’, असे रावल यांनी सांगितले.
अहवालाचे अवलोकन करुन चौकशी
‘पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चौकशी अहवालाचे अवलोकन करण्यात येणार आहे. या प्रकरणात अधिकाऱ्यांनी चौकशी पारदर्शकपणे केली नसल्याचे वाटल्यास तर पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे’, असे रावल यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) संघटक विकास लवांडे यांनी बाजार समितीत गैरव्यवहार झाल्याचे आरोप केले होते. चौकशी पारदर्शक पद्धतीने करण्यात आली नाही, असे आरोप लवांडे यांनी केले होते.
