पुणे : सुवर्ण गुंतवणूक योजनेत परतावा देण्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मराठे ज्वेलर्सच्या मंजिरी कौस्तुभ मराठे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंगळवारी न्यायालयाने फेटाळून लावला. कॉसमॉस बँकेकडून ६० कोटी रुपयांचे कर्ज घेऊन त्याची परतफेड न केल्या प्रकरणी मराठे ज्वेलर्स आणि प्रणव मराठे ज्वेलर्स प्रा. लि. यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. आरोपींनी बँकेकडून कर्ज घेऊन त्याची वेळेत परतफेड केली नसल्याने बँकेकडून त्यांना नोटीस पाठविण्यात आली होती. या प्रकरणी मिलिंद ऊर्फ बळवंत अरविंद मराठे, कौस्तुभ अरविंद मराठे (वय ५४), मंजिरी कौस्तुभ मराठे (वय ४८), नीना मिलिंद मराठे आणि प्रणव मिलिंद मराठे (वय २६, रा. रूपाली अपार्टमेंट, एरंडवणे) यांच्याविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंजिरी मराठे यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यांच्या जामीन अर्जास सरकारी वकील ॲड. मारुती वाडेकर यांनी विरोध केला. या गुन्ह्याच्या तपासासाठी त्यांना अटक करणे आवश्यक आहे, असा युक्तीवाद ॲड. वाडेकर यांनी केला. त्यानंतर न्यायलयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.